
अरुण बारसागडे, उपसंपादक न्युज जागर, चंद्रपूर
गट संसाधन केंद्र कंत्राटी कर्मचाऱ्यांचे ६ महिन्यांचे मानधन थकीत; वरोरात खासदार प्रतिभाताई धानोरकर यांना साकडे
चंद्रपूर : पाणी पुरवठा व स्वच्छता मिशन अंतर्गत काम करणाऱ्या जिल्ह्यातील गट संसाधन केंद्र कंत्राटी कर्मचाऱ्यांचे तब्बल ६ महिन्यांचे मानधन रखडल्याने कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज चंद्रपूर जिल्हा गट संसाधन केंद्र कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या वतीने चंद्रपूर-वणी- आर्णी लोकसभा क्षेत्राच्या खासदार आदरणीय प्रतिभाताई धानोरकर यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदनाद्वारे साकडे घालण्यात आले.
आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
गेल्या अनेक दिवसांपासून कर्मचाऱ्यांचे ‘कामबंद आंदोलन’ सुरू आहे. मंत्रालयात कॅबिनेट पातळीवर या विषयावर चर्चा होऊनही अद्याप स्थानिक स्तरावर हक्काचे मानधन खात्यात जमा झालेले नाही. प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. ६ महिन्यांचे मानधन तातडीने न मिळाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
कर्मचाऱ्यांची व्यथा आणि कुटुंबाची होणारी ससेहोलपट ऐकून खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. मंत्रालय स्तरावर तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तात्काळ संपर्क साधून हा न्याय्य प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असा शब्द त्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिला.
यावेळी निवेदन देताना BRC संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील नुत्तलवार, सचिव हर्षवर्धन गजभिये यांच्यासह प्रमुख सदस्य सुनील तामगाडगे, नरेश ठाकरे, सपना पुरमशेट्टीवार, लॉरेन्स खोब्रागडे, गणेश रामटेके, पुंडलिक धुर्वे, कैलास शेंडे, आशिष भैसारे, यमराज गोरंतवार, अमोल माथने, श्रीराम थूल, चेतन कलगट्टिवार, मनोज अलोने आणि चंद्रपूर जिल्ह्यातील इतर कंत्राटी कर्मचारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

