
सावलीत जागतिक बांबू दिनानिमित्त एकदिवसीय कार्यशाळा:
न्युज जागर:
योगेश रामटेके (विशेष प्रतिनिधी)
सावली, दि. १८ सप्टेंबर : जागतिक बांबू दिनानिमित्त सावली वनपरिक्षेत्र व बायोटेक ग्रीन सर्व्हिसेस प्रा. लि., चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सावली येथे एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी सामूहिक वनहक्क समितीचे पदाधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी, सरपंच, शेतकरी तसेच वन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार प्रांजली चिरडे होत्या. उद्घाटन गटविकास अधिकारी मुक्तेश्वर कोमलवार यांच्या हस्ते झाले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून अन्नपूर्णा धुर्वे यांनी बांबू लागवडीबाबत मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी ललित राऊत व वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांची प्रमुख उपस्थिती होती.


यावेळी बांबूच्या विविध प्रजाती, लागवड व व्यवस्थापन, निंदणी, हार्वेस्टिंग, मार्केटिंग तसेच बांबूपासून हस्तकला निर्मिती करून उत्पन्न वाढविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. बांबू लागवडीमुळे रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासोबतच जल व मृदसंधारण आणि पर्यावरण संतुलनास मदत होऊ शकते, असे मत व्यक्त करण्यात आले.
सावली तालुक्यातील मजुरांची रोजगारासाठी होणारी भटकंती कमी करण्यासाठी बांबू लागवड उपयुक्त ठरेल, असा विश्वास वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोद धुर्वे यांनी केले. सूत्रसंचालन वनरक्षक राजू मुरकुटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन व्ही.बी.जी.-रामजी विभागाचे श्री. भोयर यांनी केले.

