
‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’च्या संकल्पनेतून भव्य पदयात्रा व मोर्चाचे आयोजन; भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – माजी खासदार डॉ. अशोक नेते यांचे आवाहन!

जिल्हा प्रतिनिधी | गडचिरोली, दि. ३ नोव्हेंबर :
लोकशाहीचे रक्षण, संविधानिक मूल्यांचे संवर्धन आणि जनतेमध्ये लोकशाहीविषयी जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पार्टीच्या वतीने येत्या ५ नोव्हेंबर रोजी नागपूर येथे भव्य पदयात्रा व मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ या संकल्पनेतून आयोजित करण्यात येणाऱ्या या आंदोलनात गडचिरोली जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे जोरदार आवाहन भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार डॉ. अशोक नेते यांनी केले.

या पदयात्रेच्या पूर्वतयारीसाठी ३ नोव्हेंबर रोजी गडचिरोली येथील आमदार मिलिंद नरोटे यांच्या कर्तव्य कक्ष जनसंपर्क कार्यालयात भाजपची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत आगामी पदयात्रा व मोर्चाचे नियोजन, संघटनात्मक तयारी आणि कार्यकर्त्यांच्या सहभागाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. अशोक नेते म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून जनहिताच्या विविध योजना, विकासकामे आणि लोककल्याणकारी उपक्रम राबविले जात आहेत. मात्र, विरोधकांकडून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करून दिशाभूल करण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. अशा परिस्थितीत लोकशाही मूल्यांचे महत्त्व जनतेपर्यंत पोहोचविणे, वस्तुस्थिती मांडणे आणि लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी संघटितपणे पुढाकार घेणे आवश्यक आहे. त्यामुळे ५ नोव्हेंबरच्या नागपूर येथील पदयात्रेत भाजपच्या प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याने सक्रिय सहभाग नोंदवावा, असे त्यांनी स्पष्ट केले.
संघटनात्मक एकजुटीवर आमदार भांगडिया यांचा भर!
बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार तथा जिल्हा प्रभारी कीर्तिकुमार भांगडिया होते. त्यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना संघटनेतील एकजूट आणि समन्वयाचे महत्त्व अधोरेखित केले. कोणतेही संघटनात्मक कार्य यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकसंघपणे काम करणे आवश्यक असून, आगामी पदयात्रेसाठी प्रत्येकाने आपापली जबाबदारी पार पाडावी. कार्यकर्त्यांचा अधिकाधिक सहभाग निश्चित करून कार्यक्रमाचे प्रभावी नियोजन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
बैठकीला भाजपच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती
या बैठकीला आमदार डॉ. मिलिंद नरोटे, भाजप जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, नगराध्यक्षा अॅड. प्रणोतीताई निंबोरकर, माजी आमदार कृष्णा गजबे, माजी आमदार नामदेव उसेंडी, ज्येष्ठ नेते रमेश भुरसे, माजी जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे, मुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी अनिरुद्ध पालकर, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, प्रकाश गेडाम आणि सदानंद कुथे यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, नागपूर येथे ५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पदयात्रा व मोर्चाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात संघटनात्मक पातळीवर तयारीला वेग देण्यात येत आहे. लोकशाही मूल्यांच्या जपणुकीचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने नागपूर येथे उपस्थित राहावे, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.

