
जातीनिहाय जनगणना, लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण आणि ओबीसींच्या प्रलंबित प्रश्नांवर काँग्रेसच्या राष्ट्रीय व प्रदेश नेतृत्वाशी महेंद्र ब्राह्मणवाडे यांची चर्चा

जिल्हा प्रतिनिधी|गडचिरोली,दि.३ नोव्हेंबर : ओबीसी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी, सामाजिक न्यायासाठी आणि संघटनात्मक बळकटीकरणासाठी काँग्रेसच्या राष्ट्रीय व महाराष्ट्र प्रदेश नेतृत्वासोबत नवी दिल्लीत महत्त्वपूर्ण चर्चा पार पडली. यावेळी महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अनिल जय हिंदजी आणि महाराष्ट्र ओबीसी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. यशपाल भिंगे यांची सदिच्छा भेट घेतली.
या भेटीदरम्यान महाराष्ट्रातील ओबीसी काँग्रेसची संघटनात्मक वाटचाल, राज्यभर संघटन अधिक मजबूत करणे, ओबीसी समाजाचे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले प्रश्न आणि आगामी संघटनात्मक उपक्रम यावर सविस्तर विचारविनिमय करण्यात आला.

जातनिहाय जनगणना हाच सामाजिक न्यायाचा महत्त्वाचा आधार!
ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना तातडीने करण्यात यावी, ही प्रमुख मागणी यावेळी ठामपणे मांडण्यात आली. ओबीसी समाजाची नेमकी लोकसंख्या समोर आल्याशिवाय समाजाला त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात न्याय्य हक्क, अधिकार, आरक्षण आणि विकासाच्या संधी मिळणे शक्य नाही. त्यामुळे जातनिहाय जनगणनेच्या माध्यमातून ओबीसी समाजाला सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय न्याय मिळवून देण्याच्या दिशेने प्रभावी भूमिका घेण्याबाबत चर्चा करण्यात आली.
ओबीसी समाजाचे प्रश्न केवळ चर्चेपुरते मर्यादित न राहता त्यासाठी संघटितपणे आवाज उठवणे, समाजातील विविध घटकांना एकत्र आणणे आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी व्यापक जनजागृती करणे, यावरही विशेष भर देण्यात आला.
याप्रसंगी राष्ट्रीय समन्वयक अजय हटेवार, यवतमाळ जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ॲड. सचिन नाईक, भूषण तल्हार, सचिन वैद्य, प्रमोद शिंगणे, नितीन डोंगरे, अमरावती समन्वयक कैलास काटे, नाशिक समन्वयक गौरव वाघ, नागपूर विभाग समन्वयक मोरेश्वर भादे यांच्यासह ओबीसी काँग्रेसचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
ओबीसी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी राष्ट्रीय स्तरावर आवाज बुलंद करण्याच्या दृष्टीने ही भेट महत्त्वपूर्ण ठरली असून, संघटनात्मक एकजुटीच्या माध्यमातून आगामी काळात ओबीसींच्या प्रश्नांना अधिक व्यापक व्यासपीठ मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

