
येणापूर ते आष्टी महामार्गावर चक्काजाम आंदोलनासाठी हजारोंचा मोर्चा; महिला भगिनींचाही उत्स्फूर्त सहभाग

नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली (चामोर्शी),दि.२ नोव्हेंबर : जमीन अधिग्रहणाच्या मुद्द्यावरून येणापूर परिसरातील शेतकऱ्यांचा संताप दिवसेंदिवस वाढत असून, आपल्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाने आता तीव्र स्वरूप धारण केले आहे. दि. २८ ऑक्टोबर २०२६ पासून येणापूर येथे सुरू असलेल्या आंदोलनातून अद्याप कोणताही ठोस तोडगा निघाला नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सोमवार, दि. २ नोव्हेंबर रोजी येणापूर ते आष्टी असा भव्य मोर्चा काढून महामार्गावर चक्का जाम आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

या आंदोलनात येणापूर परिसरातील तब्बल १३ गावांतील शेतकरी, महिला व नागरिक सहभागी झाले असून, आंदोलनस्थळी जवळपास पाच हजार शेतकरी बांधवांची उपस्थिती असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. येणापूर येथून आष्टीच्या दिशेने निघालेल्या या मोर्चामुळे परिसरातील वातावरण आंदोलनमय झाले आहे.
पोलिसांचा मोठा बंदोबस्त; गावागावांत नाकाबंदीचे प्रयत्न
शेतकऱ्यांच्या चक्का जाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परिसरातील १३ गावांमध्ये हजारो पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. आंदोलनात सहभागी होण्यासाठी बाहेर पडणाऱ्या शेतकऱ्यांना गावातच रोखण्याचे प्रयत्न पोलिस यंत्रणेकडून करण्यात आल्याचा आरोप आंदोलक शेतकऱ्यांनी केला आहे.
मात्र, या प्रयत्नांना न जुमानता शेतकऱ्यांनी एकजुटीचे दर्शन घडविले. लक्ष्मणपूर येथून शेतकरी बांधवांसह महिला भगिनीही विविध मार्गांनी येणापूर येथे दाखल झाल्या. गावागावांतून शेतकरी मोठ्या संख्येने एकत्र येत असल्याने आंदोलनाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे.
प्रशासनाच्या भूमिकेविरोधात शेतकऱ्यांची एकजूट
जमीन अधिग्रहणाच्या प्रश्नावर प्रशासनाकडून अद्याप समाधानकारक निर्णय घेण्यात आलेला नसल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. वारंवार आंदोलन करूनही मागण्यांबाबत ठोस निर्णय होत नसल्याने शेतकऱ्यांनी आता महामार्गावर उतरून आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा निर्धार केला आहे.
पोलिसांकडून गावागावांत करण्यात येणाऱ्या बंदोबस्तानंतरही शेतकऱ्यांनी माघार न घेता एकजुटीने आंदोलनात सहभागी होण्याचा मार्ग स्वीकारला. मिळेल त्या मार्गाने शेतकरी येणापूरकडे रवाना झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. यामध्ये महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग असल्याने आंदोलनाची तीव्रता अधिक वाढली आहे.
आष्टी महामार्ग चक्का जाम करण्याचा निर्धार
येणापूर येथून आष्टीच्या दिशेने निघालेल्या मोर्चाचा मुख्य उद्देश महामार्गावर चक्का जाम करून जमीन अधिग्रहणाच्या प्रश्नाकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधणे हा आहे. हजारोंच्या संख्येने शेतकरी एकत्र आल्याने प्रशासनासमोर परिस्थिती हाताळण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. आष्टी येथे मोर्चा पोहोचल्यानंतर आंदोलनाचे पुढील स्वरूप काय असेल, तसेच प्रशासनाकडून शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत कोणती भूमिका घेतली जाते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
शेतकरी एकजुटीचा विजय असो’च्या घोषणांनी परिसर दणाणला!
मोर्चादरम्यान शेतकरी बांधवांनी एकजुटीच्या घोषणा देत आपल्या मागण्यांसाठी लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. ‘शेतकरी एकजुटीचा विजय असो’ अशा घोषणांनी येणापूर परिसर दणाणून गेला. जमीन अधिग्रहणाच्या प्रश्नावर तोडगा निघेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार आंदोलकांकडून व्यक्त केला जात आहे.
आता शासन आणि प्रशासन शेतकऱ्यांच्या या तीव्र आंदोलनाची कितपत दखल घेते आणि चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेते, याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.

