
शेतीचे उत्पादन होणार नसल्याने आणि बँकेचे कर्ज कसे फेडायचे, या चिंतेत ३६ वर्षीय शेतकऱ्याने चिंचेच्या झाडाला घेतला गळफास; भेंडाळा परिसरात हळहळ!

चामोर्शी : निसर्गाच्या लहरीपणाचा आणि शेतीतील अनिश्चिततेचा आणखी एक दुर्दैवी फटका शेतकरी कुटुंबाला बसला आहे. वेळेवर पाऊस न पडल्याने शेतातील धानपीक करपून गेले. त्यामुळे यंदा शेतीतून उत्पादन होणार नाही आणि बँकेचे कर्ज कसे फेडायचे, या आर्थिक विवंचनेतून भेंडाळा येथील ३६ वर्षीय शेतकऱ्याने स्वतःच्या शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन जीवन संपविल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे.
सचिन भाऊजी सातपूते (वय ३६ वर्षे, रा. भेंडाळा, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, सचिन सातपूते हे घटनेच्या दिवशी सकाळी ८ वाजताच्या सुमारास आपल्या शेतावर गेले होते. मात्र, वेळेवर पाऊस न पडल्यामुळे शेतातील धानपीक करपून गेले होते. त्यामुळे यंदा शेतीचे अजिबात उत्पादन होणार नाही, तसेच बँकेचे कर्ज कसे फेडायचे, या चिंतेने ते व्यथित झाले होते. याच विवंचनेतून त्यांनी स्वतःच्या शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास घेतल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली.
या घटनेची माहिती मिळताच चामोर्शी पोलिसांनी नोंद घेतली. याप्रकरणी पोलीस स्टेशन चामोर्शी येथे मर्ग क्रमांक ६९/२०२६, कलम १९४ भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार शिवदास दुर्गे (ब.नं. २४२६), पोलीस स्टेशन चामोर्शी करीत आहेत.
एका शेतकऱ्याच्या मृत्यूने भेंडाळा परिसरात शोककळा पसरली असून, निसर्गाच्या अवकृपेने आणि आर्थिक संकटाने शेतकरी किती हतबल होत आहेत, हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

