
वैशालीताई नागवडे यांचे महिला शक्तीला संघटित होऊन सुरक्षितता, स्वाभिमान आणि स्वावलंबनासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन; महिला सक्षमीकरणाचा निर्धार

नितेश गट्टीवार | जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली : महिलांचे हक्क, सन्मान, सुरक्षितता आणि आर्थिक स्वावलंबनाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, गडचिरोली जिल्ह्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य महिला मेळाव्यात महिला शक्तीच्या संघटनात्मक एकजुटीचा निर्धार व्यक्त करण्यात आला. आरमोरी रोडवरील गाणली समाज सभागृहात शनिवार, ३१ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या या मेळाव्याला जिल्हाभरातील महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या आणि महिला भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखाली महिलांचे प्रश्न, हक्क आणि सक्षमीकरणाला संघटनात्मक बळ देण्याच्या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष वैशालीताई नागवडे यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित महिलांना संबोधित केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर होते.
महिलांनी केवळ सहभागी नव्हे, तर नेतृत्वाची धुरा सांभाळावी! – वैशालीताई नागवडे
महिला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर वैशालीताई नागवडे यांनी महिला संघटना अधिक मजबूत करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. महिलांनी आपल्या हक्कांची आणि अधिकारांची जाणीव ठेवून शिक्षण, आरोग्य, सुरक्षितता, रोजगार आणि आर्थिक स्वावलंबनासाठी संघटितपणे पुढाकार घ्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले.
महिलांचा सहभाग केवळ कार्यक्रमांपुरता मर्यादित न राहता सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रातील निर्णयप्रक्रियेतही त्यांना महत्त्वाचे स्थान मिळाले पाहिजे. महिलांनी स्वतःचे नेतृत्व विकसित करून समाजाच्या विकासात सक्रिय भूमिका बजावावी, असे आवाहन त्यांनी केले.
महिलांच्या स्थानिक समस्या, अन्याय आणि अडचणींना संघटनेच्या माध्यमातून प्रभावीपणे वाचा फोडून त्यांच्या सन्मानासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने लढा उभारण्याचा संदेशही त्यांनी दिला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थित महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.
आदिवासीबहुल गडचिरोलीत महिलांच्या रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर!
गडचिरोली हा आदिवासीबहुल जिल्हा असून येथील महिलांसमोर शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि आर्थिक स्वावलंबनाची अनेक आव्हाने आहेत. जिल्ह्यात सुरजागड प्रकल्पासह विविध विकासाच्या संधी निर्माण होत असताना स्थानिक महिलांना कौशल्य प्रशिक्षण, रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली.
महिलांना केवळ शासकीय योजनांचा लाभ मिळण्यापुरते मर्यादित न ठेवता त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण, रोजगाराच्या संधी आणि आर्थिक पाठबळ मिळावे, यासाठी संघटनेने प्रयत्नशील राहण्याची भूमिका मांडण्यात आली.
महिला सक्षमीकरणासाठी संघटनात्मक ताकद उभी करू – रवींद्र वासेकर
कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांनी महिला सक्षमीकरण हे पक्षाच्या संघटनात्मक कार्यातील महत्त्वाचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील महिलांचे सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक सक्षमीकरण साधण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
महिलांना पक्ष संघटनेत अधिकाधिक संधी देणे, त्यांच्या नेतृत्वगुणांना प्रोत्साहन देणे, महिलांच्या स्थानिक समस्या जाणून घेऊन त्यांना न्याय मिळवून देणे आणि निर्णयप्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढविणे यावर त्यांनी विशेष भर दिला.
माजी मंत्री तथा आमदार राजे धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनात जिल्ह्यात पक्ष संघटनेचे कार्य सुरू असल्याचे सांगत, जिल्ह्याच्या विकासासोबतच महिला सक्षमीकरण, रोजगारनिर्मिती आणि महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची भूमिका त्यांनी मांडली.
जिल्हाभरातील महिला शक्तीचा उत्स्फूर्त सहभाग
वैशालीताई नागवडे यांचे मार्गदर्शन आणि जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांचे आवाहन यामुळे संपूर्ण सभागृहात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. जिल्ह्याच्या विविध तालुक्यांतून महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या. महिलांचे संघटन अधिक मजबूत करून त्यांच्या हक्कांसाठी, सुरक्षिततेसाठी, स्वाभिमानासाठी आणि आर्थिक स्वावलंबनासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या मेळाव्यामुळे जिल्ह्यातील महिला संघटनात्मक कार्याला नवी दिशा मिळण्यासोबतच महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नव्या जोमाने काम करण्याची प्रेरणा निर्माण झाली.
मेळाव्याला मान्यवरांची उपस्थिती
यावेळी पुष्पाताई भुरळे (वरिष्ठ उपाध्यक्ष, महिला राष्ट्रवादी काँग्रेस), पिंकूभाऊ बावणे (सभापती, नगर परिषद देसाईगंज तथा तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस), नंदू नरोटे (कार्यकारी जिल्हाध्यक्ष), लीलाधर भरडकर (जिल्हाध्यक्ष, युवक राष्ट्रवादी काँग्रेस), युनूस शेख (प्रदेश सचिव), पुष्पा अलोणे, प्रा. रिंकू पापडकर, सारिका गडपल्लीवार, वृषाली भोयर, सुषमा येवले, उमा बन्सोड, विवेक बाबनवाडे, रियाज शेख, वेंकट भुरळे, हेमंत भाकरे, सुनील नंदनवार, बी. टी. सोलेकर, प्रमोद वैद्य, संजय रामने, देवीदास कापकर, विजय धमाते, योगेश नांदगाये, कपिल बागडे, गुड्डू म्हस्के, संजय सिंगाडे, मधुकर रेवाडे, किशोर बावणे, वेंकटलक्ष्मी आर्वेड्डी, चल्लाताई, पौर्णिमा श्रीरामवार, रुपाली दुधबावरे, अर्चना वालदे, कामरोत, गावडेताई, गराडेताई, मनीषा गोंदोडे, पिपरेताई, पल्लवी रामटेके, कुणाल चिलगेलवार यांच्यासह जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महिलांचे हक्क, महिलांचा सन्मान आणि महिलांचे स्वावलंबन या त्रिसूत्रीवर आधारित संघटनात्मक चळवळ अधिक व्यापक करण्याचा निर्धार व्यक्त करीत हा महिला मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

