
शिक्षकांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसह नावीन्यपूर्ण अध्यापन पद्धतींवर मार्गदर्शन; शिक्षण विस्तार अधिकारी दिनकर राऊत यांचा विशेष सत्कार

एटापल्ली : पंचायत समिती एटापल्ली अंतर्गत केंद्र एटापल्लीची चतुर्थ शिक्षण परिषद शुक्रवार, दिनांक ३० ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जवेली (म) येथे उत्साहपूर्ण आणि शैक्षणिक वातावरणात संपन्न झाली. केंद्रातील शिक्षकांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करणे, अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत नावीन्यपूर्ण उपक्रमांचा समावेश करणे, विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तींमध्ये सुधारणा घडवून आणणे तसेच शासनाच्या विविध शैक्षणिक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करणे हा परिषदेचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुधाकर लेकामी होते, तर उद्घाटक म्हणून पंचायत समिती एटापल्लीचे शिक्षण विस्तार अधिकारी दिनकर राऊत उपस्थित होते. केंद्रप्रमुख कु. अरुणा बर्लावार यांनी परिषदेचे संयोजन केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष दिनेश इष्टाम, गुरुपल्ली शाळेच्या मुख्याध्यापिका तोटावार मॅडम, साधन व्यक्ती झाडे मॅडम, खोब्रागडे सर, कृष्णार शाळेचे मुख्याध्यापक शेख सर आदी मान्यवर उपस्थित होते. दीपप्रज्वलन, मान्यवरांचे स्वागत आणि प्रास्ताविकाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी शिक्षकांची नावनोंदणी करून DITE लिंकद्वारे पूर्वचाचणी घेण्यात आली. तसेच उपस्थित शिक्षक व मान्यवरांनी आनापान प्रात्यक्षिकात सहभाग घेतला.
परिषदेच्या शैक्षणिक सत्रात विविध महत्त्वपूर्ण विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. किशोर खोब्रागडे सर यांनी इयत्ता सहावीच्या कौशल्य मेळाव्याची माहिती देताना विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देणे, विविध कौशल्यांचा विकास करणे आणि कृतीतून शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट केले. राजीव गांधी हायस्कूल, एटापल्ली येथील सहाय्यक शिक्षक बारई सर यांनी हॅकथॉन उपक्रमाची माहिती देत विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, नवकल्पना, समस्या निराकरण क्षमता आणि तंत्रज्ञानाचा शैक्षणिक वापर वाढविण्याची गरज अधोरेखित केली. साधन व्यक्ती झाडे मॅडम यांनी मूल्यवर्धन विषयावर मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्ये, शिस्त, प्रामाणिकपणा, सहकार्य, सामाजिक जाणीव आणि जबाबदारीची भावना विकसित करण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. दुसऱ्या सत्रात पीएमश्री शाळा एटापल्लीच्या टेकुलवार मॅडम यांनी मूल्यवर्धन कार्यक्रमाची उद्दिष्टे, अंमलबजावणी आणि विद्यार्थ्यांच्या वर्तनातील सकारात्मक बदल याविषयी सविस्तर माहिती दिली. जीवनोपयोगी कौशल्ये, भावनिक विकास आणि सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी विविध शैक्षणिक कृतींचा वापर कसा करावा, याबाबत त्यांनी उदाहरणांसह मार्गदर्शन केले. यानंतर DITE लिंकद्वारे अंतिम चाचणी घेऊन शिक्षकांच्या ज्ञानातील प्रगतीचा आढावा घेण्यात आला.

शिक्षण परिषदेच्या समारोप सत्रात केंद्रप्रमुख कु. अरुणा बर्लावार यांच्या मार्गदर्शनाखाली शाळास्तरीय शैक्षणिक अडचणी, प्रशासकीय बाबी, आगामी शैक्षणिक उपक्रमांचे नियोजन आणि शिक्षकांमधील समन्वय या विषयांवर चर्चा करण्यात आली. परिषदेत मिळालेले ज्ञान प्रत्यक्ष अध्यापन प्रक्रियेत उपयोगात आणून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले. यानंतर शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे पंचायत समिती एटापल्लीचे शिक्षण विस्तार अधिकारी दिनकर राऊत यांचा विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. उपस्थित मान्यवर व शिक्षकवृंद यांच्या हस्ते त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले, तसेच शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. शाळांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी केलेले मार्गदर्शन आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल यावेळी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. सत्काराला उत्तर देताना राऊत यांनी शिक्षकांना मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, गुणवत्तापूर्ण शिक्षण, नावीन्यपूर्ण अध्यापन पद्धती आणि शाळेच्या प्रगतीसाठी समर्पित भावनेने कार्य करण्याचे आवाहन केले. बदलत्या शैक्षणिक प्रवाहानुसार शिक्षकांनी स्वतःमध्ये आवश्यक बदल घडवून आणणे गरजेचे असल्याचेही त्यांनी प्रतिपादन केले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही. के. वेलादी सर आणि एस. एम. उसेंडी सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन पंदेवाही टोला येथील मुख्याध्यापक व्ही. के. वेलादी सर यांनी केले. कार्यक्रमाचे छायाचित्रण पुल्लुरवार सर, निलावार सर आणि एटापल्ली टोला येथील भोयर सर यांनी केले. कार्यक्रमाचे संकलन गेडाम सर (पंदेवाही टोला) आणि सुरेश उसेंडी (पेठा) यांनी केले. शिक्षकांच्या ज्ञानवृद्धीसह शैक्षणिक अनुभवांची देवाणघेवाण, नावीन्यपूर्ण अध्यापन पद्धतींची माहिती आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा संकल्प अशा सकारात्मक वातावरणात केंद्र एटापल्लीची चतुर्थ शिक्षण परिषद व दिनकर राऊत यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला

