
कसनसूर पोलिसांची मध्यरात्री कारवाई; १०.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त, तेलंगणा व छत्तीसगडमधील तिघांवर गुन्हा दाखल

एटापल्ली : छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून असलेल्या भूमकाम परिसरात गोवंशाची अवैध वाहतूक होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कसनसूर पोलिसांनी मध्यरात्री केलेल्या कारवाईत सात गोवंश जातीच्या जनावरांची सुटका केली असून, वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला टाटा ट्रकही जप्त केला आहे. या कारवाईत जनावरांसह एकूण १० लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला आहे. या प्रकरणी तेलंगणा आणि छत्तीसगड राज्यातील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १.१५ ते पहाटे ४ वाजताच्या सुमारास मौजा भूमकाम येथे गोपनीय माहितीच्या आधारे वाहन तपासणी करण्यात आली. यावेळी संशयास्पद टाटा ट्रकची तपासणी केली असता, वाहनाच्या मागील हौद्यात सात गोवंश जातीची जनावरे अत्यंत कमी जागेत दाटीवाटीने आणि करकचून बांधून ठेवलेली आढळली. जनावरांची वाहतूक अमानुष पद्धतीने केली जात असल्याचे निदर्शनास येताच पोलिसांनी वाहनासह सर्व जनावरे ताब्यात घेतली.

या प्रकरणी शेख आवेश शेख मेहबूब (३९, रा. आसिफाबाद, तेलंगणा), सुबल सुधीर मंडळ (४६, रा. बांदे, छत्तीसगड) आणि समीर प्रांबलब साह (४०, रा. बांदे, छत्तीसगड) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता, प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० आणि महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम १९७६ मधील संबंधित तरतुदींनुसार उपपोलीस ठाणे कसनसूर येथे अप. क्र. १६/२०२६ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कैलास बेले करीत आहेत.
सीमावर्ती भागातील अवैध व्यवसायांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
भूमकाम हे छत्तीसगडच्या सीमेलगत असल्याने या परिसरातील अवैध हालचालींचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. गोवंशाच्या अवैध वाहतुकीसोबतच अवैध दारू आणि सुगंधित तंबाखूच्या व्यवसायाबाबतही स्थानिक स्तरावर चर्चा होत आहे. गोवंश तस्करीचा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू असल्याचे दावे केले जात असताना, या व्यवहारामागे नेमके कोण कार्यरत आहे आणि त्याचे जाळे किती विस्तृत आहे, याचा तपास होणे आवश्यक आहे.
कथित मुख्य सूत्रधार नारायण शाहा याच्या भूमिकेची चौकशी होणार का?
दरम्यान, या प्रकरणातील कारवाईनंतर कथित मुख्य सूत्रधाराचा मुद्दा देखील चर्चेत आला आहे. स्थानिक पातळीवर छत्तीसगडमधील नारायण शाहा नामक व्यक्तीचे नाव या कथित व्यवसायाशी जोडले जात असून, तो दीर्घकाळापासून या अवैध व्यवहारात सक्रिय असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या आरोपांची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही.
या व्यवसायात काही अल्पवयीन मुलांचा वापर केला जात असल्याचीही चर्चा असून, हा आरोप गंभीर स्वरूपाचा आहे. त्यामुळे त्याची स्वतंत्रपणे पडताळणी होणे गरजेचे आहे. पोलिसांनी अटक किंवा गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींच्या भूमिकेपुरताच तपास मर्यादित न ठेवता, कथित मुख्य सूत्रधार, आर्थिक व्यवहार, जनावरांची खरेदी-विक्री आणि वाहतुकीमागील संपूर्ण साखळी तपासावी, अशी मागणी पुढे येत आहे.
कसनसूर पोलिसांची कारवाई महत्त्वपूर्ण असली, तरी एका वाहनावर कारवाई करून हा प्रश्न संपणार नाही. सीमावर्ती भागातून सुरू असलेल्या कथित अवैध व्यवसायांच्या मुळापर्यंत पोहोचून त्यांचे जाळे उघड करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. नारायण शाहा याच्याबाबतच्या चर्चेत कितपत तथ्य आहे, अल्पवयीन मुलांच्या कथित सहभागाची सत्यता काय आणि या तस्करीमागे आणखी कोणाचे हात आहेत, हे पोलीस तपासातून स्पष्ट होणार का, याकडे आता परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

