
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली

राष्ट्रीय एकता दिन उत्साहात साजरा; मॅरेथॉन, सायबर रॅली आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन
कोरची :

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त तसेच राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधून कोरची पोलीस ठाण्याच्या वतीने शनिवारी (३१ ऑक्टोबर) ‘रन फॉर युनिटी’ आणि ‘डिजिटल एकता मॅरेथॉन’ चे उत्साहात आयोजन करण्यात आले. या उपक्रमात पोलीस अधिकारी, जवान, युवक-युवती, नागरिक तसेच शासकीय आश्रमशाळा आणि एकलव्य विद्यालयातील विद्यार्थ्यांसह ३०० हून अधिक स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
तालुक्यातील नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि संविधानिक मूल्यांविषयी जनजागृती व्हावी, या उद्देशाने पोलीस निरीक्षक दीपक डोंब यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.
३ किलोमीटर अंतराची होती मॅरेथॉन
मॅरेथॉनला सकाळी ७ वाजता फवारा चौक येथून सुरुवात झाली. फवारा चौक ते बेकाठी रस्त्यावरील गुटेकसा या तीन किलोमीटरच्या मार्गावर ही स्पर्धा घेण्यात आली. पोलीस निरीक्षक दीपक डोंब आणि ज्येष्ठ नागरिक ऋषिजी रावतुरे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून मॅरेथॉनचा शुभारंभ करण्यात आला. विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. #newsjagar #awajsatyacha #korchi

मॅरेथॉन स्पर्धेचे विजेते
मुलांचा गट:
- प्रथम: मनीष काशीनाथ मोहुले (कोरची)
- द्वितीय: सुभाष शालीकराम हलामी (बोदालदंड)
- तृतीय: अरुण बंशीलाल काटेगे (सोहले)
मुलींचा गट:
- प्रथम: प्रिती दसरो पुडो (गुटेकसा)
- द्वितीय: लक्ष्मी हरिदास ब्राह्मण (कोरची)
- तृतीय: रोहिणी रामू हलामी
सायबर गुन्ह्यांपासून सतर्कतेसाठी जनजागृती रॅली
या उपक्रमासोबतच महाराष्ट्र सायबर जनजागृती अभियानांतर्गत फवारा चौक ते कोरची पोलीस ठाण्यापर्यंत विशेष सायबर जनजागृती रॅली काढण्यात आली. नागरिकांनी ऑनलाइन फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांपासून सतर्क राहावे, असा संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला. तसेच, एकलव्य विद्यालय येथे विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला सहायक पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, पोलीस उपनिरीक्षक नागेश टेकाम, परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कदम, परिविक्षाधीन महिला पोलीस उपनिरीक्षक सोनाली बल्लाळ, एसआरपीएफचे पोलीस निरीक्षक निकम, शासकीय आश्रमशाळेचे शिक्षक डोक सर, ज्येष्ठ नागरिक ऋषिजी रावतुरे, नसरूजी भामानी, पत्रकार नंदूजी वैरागडे यांच्यासह पोलीस कर्मचारी आणि कोरचीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोलीस कर्मचारी, एसआरपीएफ जवान, शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.

