
बैल चारून घरी परतताना दबा धरून बसलेल्या वाघाचा अचानक हल्ला; जखमी शेतकऱ्याला गडचिरोली येथे हलविले

चामोर्शी : चामोर्शी तालुक्यातील तळोधी (मो.) वनक्षेत्रांतर्गत खोर्दा गावाजवळ वाघाने एका शेतकऱ्यावर अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना आज (दि. ३१ ऑक्टोबर) दुपारी सुमारे ३.४५ वाजताच्या सुमारास घडली. या हल्ल्यात सुनील पिंपरे (वय ५० वर्षे, रा. खोर्दा) हे शेतकरी जखमी झाले असून, या घटनेमुळे परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुनील पिंपरे हे आपल्या शेतात बैल चारण्यासाठी घेऊन गेले होते. बैल चारून झाल्यानंतर ते बैलांसह घराकडे परत येत असताना श्रावण नैताम यांच्या शेताजवळ दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या अनपेक्षित हल्ल्यात पिंपरे जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच जखमी सुनील पिंपरे यांना तातडीने आमगाव (म.) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी चामोर्शी येथे पाठविण्यात आले. मात्र, प्रकृतीच्या पुढील उपचारांच्या दृष्टीने त्यांना गडचिरोली येथील रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच चामोर्शी वनपरिक्षेत्राधिकारी आकाश मल्लेलवार यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रसहाय्यक सलीम कुरेशी व तळोधी बिटचे वनरक्षक प्रमोद धाडसे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
शेतकऱ्यांमध्ये दहशत; वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात!
खोर्दा परिसरात वाघाच्या हल्ल्याची घटना घडल्याने शेतात जाणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सध्या शेतीची कामे सुरू असल्याने शेतकऱ्यांना दररोज शेतात जावे लागते. अशा परिस्थितीत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांचा धोका वाढल्याने वनविभागाने परिसरात गस्त वाढवावी, वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवावे आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

