
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त पोलीस स्टेशन चामोर्शीचा स्तुत्य उपक्रम; ४० ते ५० युवक-युवतींसह नागरिकांचा सहभाग

जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
गडचिरोली (चामोर्शी),दि.३१ ऑक्टोबर : देशाचे लोहपुरुष आणि भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ३१ ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण देशात ‘राष्ट्रीय एकता दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त पोलीस स्टेशन चामोर्शीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘रन फॉर युनिटी’ मॅरेथॉन स्पर्धेला युवक-युवतींसह स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

शनिवार, दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ६.१५ वाजता पोलीस स्टेशन चामोर्शी येथून या मॅरेथॉन स्पर्धेला उत्साहात सुरुवात करण्यात आली. यामध्ये ३ किलोमीटर आणि ५ किलोमीटर अशा दोन अंतरांच्या धावण्याच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
या मॅरेथॉनमध्ये पोलीस स्टेशन चामोर्शी येथील अधिकारी व पोलीस अंमलदारांसह युवक-युवती तसेच स्थानिक नागरिक अशा एकूण अंदाजे ४० ते ५० जणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. देशाची एकता, अखंडता आणि बंधुभावाचा संदेश देत सहभागी स्पर्धकांनी उत्साहाने धाव घेतली.
स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच सहभागी युवक-युवती आणि नागरिकांसाठी पोलीस स्टेशन चामोर्शीच्या वतीने चहा व नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती.
राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश, युवकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता आणि देशभक्तीची भावना वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.
पोलीस स्टेशन चामोर्शीचे पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.

