
नवीन लाभार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन; नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत विविध रब्बी पिकांच्या बियाण्यांचे वितरण

जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली (चामोर्शी) दि.३१ ऑक्टोबर: शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध कृषी योजनांची माहिती मिळावी, तसेच योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने ३० ऑक्टोबर २०२६ रोजी चामोर्शी तालुक्यातील गावोगावी पीएम किसान सन्मान निधी योजनेबाबत विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात आली.

यावेळी सहायक कृषी अधिकारी प्रदीप मुंडे यांनी शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २४ व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात सविस्तर माहिती दिली. तसेच अद्याप या योजनेचा लाभ न मिळालेल्या पात्र नवीन शेतकऱ्यांनी योजनेत नोंदणी करून अर्ज करावेत, असे आवाहन केले. अर्जासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची माहिती देत अर्ज प्रक्रियेबाबतही शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.
दरम्यान, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना विविध पिकांच्या बियाण्यांचे वितरण करण्यात आले. यामध्ये जवस, मोहरी, करडई आणि रब्बी ज्वारी या पिकांच्या बियाण्यांचा समावेश होता. रब्बी हंगामात विविध पिकांचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने या उपक्रमाची माहिती देण्यात आली.
याशिवाय महिला शेतकऱ्यांना महिला शेतकरी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आवश्यक असलेली अर्ज प्रक्रिया समजावून सांगण्यात आली. तसेच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेबाबतही जनजागृती करून या योजनेच्या माध्यमातून कृषीपूरक उद्योग सुरू करण्याच्या संधींची माहिती देण्यात आली.
या जनजागृती उपक्रमामुळे शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांची माहिती मिळण्यास मदत झाली. यावेळी कृषी विभागाचे समन्वयक तुषार महाकाळकर तसेच गावातील शेतकरी, महिला शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

