Farmer killed in tiger attack near village

वनविभागाच्या अधिकार्यांविरुद्ध तीव्र संताप

अरुण बारसागडे, उपसंपादक, न्यूज जागर, चंद्रपूर
सिंदेवाही तालुक्यात वाघाच्या हल्ल्यांचे सत्र सुरूच असून, शुक्रवारी (दि. ३०) सायंकाळी नवरगावजवळील धुमनखेडा येथील शेतकरी पत्रू रामाजी मेश्राम (वय ७५) हे सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास स्वतःच्या शेताकडे जात असताना गावानजीक प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला असता त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच गावकरी, वनविभागाचे अधिकारी व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला.
२४ तारखेला तालुक्यातील पळसगाव जाट येथील नानाजी नारायण कामडी (वय ५३, रा. पळसगाव जाट) तर रविवारी ता. २५ ला भेंडाळा येथील अंगणवाडी शिक्षिका प्रेमीला पुंडलिक महाडोरे (वय ५०, रा. भेंडाळा, ता. सिंदेवाही) वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली, त्यानंतर आज पुन्हा घडलेल्या या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. Farmer killed in tiger attack near village

ग्रामस्थांच्या मते, वाघाने शेतकऱ्यांच्या नरडीचा घोट घेत असतांना सुद्धा वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी मात्र प्रत्यक्ष मैदानावर उतरून उपाययोजना करण्याऐवजी स्वतःच्या ‘एसी’ केबिनमध्ये बसून कागदी घोडे नाचवण्यात धन्यता मानत आहेत. वन्यजीव आणि मानवी संघर्ष रोखण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी येतो कुठे? असा रोकडा सवाल आता सामान्य नागरिक विचारत आहेत.
एखादी दुर्घटना घडली की वनविभागाचे कर्मचारी तात्पुरते घटनास्थळी पोहोचतात, पंचनामा करतात आणि निघून जातात. वाघाला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावणे, कसून गस्त घालणे किंवा थर्मल ड्रोनच्या साहाय्याने त्याचा माग काढणे यांसारख्या आधुनिक उपाययोजनांमध्ये वनविभाग सपशेल अपयशी ठरला आहे. अधिकार्यांच्या या निष्काळजीपणामुळे ग्रामस्थांना रात्रीची झोप तर दूरच, पण दिवसाही घरातून बाहेर पडणे कठीण झाले आहे. #newsjagar
वाघाच्या दहशतीखाली किती दिवस जगायचे, वनविभागाच्या अधिकार्यांना जनतेच्या जिवापेक्षा वाघाची जास्त काळजी आहे का?” अशा शब्दांत संतप्त ग्रामस्थांनी आपला रोष व्यक्त केला. जर येत्या २४ तासांत वाघाचा तातडीने बंदोबस्त करून नागरिकांना सुरक्षितता दिली नाही, तर वनविभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

