
बँकेतून पैसे काढून बसची प्रतीक्षा करत असताना चोरट्याने कापली कापडी थैली; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

जिल्हा प्रतिनिधी|गडचिरोली( चामोर्शी) : बँकेतून पैसे काढून गावाकडे जाण्यासाठी बसची प्रतीक्षा करणाऱ्या एका महिलेच्या कापडी थैलीला कापून अज्ञात चोरट्याने तब्बल ४० हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना शुक्रवार, ३० ऑक्टोबर रोजी चामोर्शी येथील आष्टी टी-पॉइंटपासून सुमारे ८०० मीटर दक्षिणेकडे घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, सार्वजनिक ठिकाणी नागरिकांच्या पैशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नेमकी घटना काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुरखळा माल येथील रहिवासी निमलाबाई मुरलीधर बुरे (वय ५३ वर्षे, व्यवसाय मजुरी) यांनी बँकेतील सेतू केंद्रातून पैसे काढले होते. ही रक्कम त्यांनी आपल्या कापडी थैलीत ठेवली आणि गावाकडे जाण्यासाठी आष्टी टी-पॉइंटवर येऊन बसची प्रतीक्षा करू लागल्या.
दरम्यान, सकाळी १०.५० ते ११.१५ वाजताच्या सुमारास बस आल्यानंतर त्या बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या कापडी थैलीला कापून त्यातील रोकड लंपास केली. थैलीमध्ये ५०० रुपयांच्या ४० नोटा, म्हणजेच २० हजार रुपये, तसेच १०० रुपयांच्या २०० नोटा, म्हणजेच आणखी २० हजार रुपये होते. अशा एकूण ४० हजार रुपयांच्या रोकडवर चोरट्याने डल्ला मारला.
चामोर्शी पोलिसांत गुन्हा दाखल
या प्रकरणी निमलाबाई बुरे यांच्या तोंडी तक्रारीवरून चामोर्शी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक महादेव ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अतुल मडावी करीत आहेत.
बसस्थानक व गर्दीच्या ठिकाणी सावधानता गरजेची!
बँकेतून पैसे काढल्यानंतर प्रवासादरम्यान नागरिकांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. गर्दीच्या ठिकाणी तसेच बसमध्ये चढताना आपल्या पैशांची आणि मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी, असे आवाहन या घटनेच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत आहे.

