
गांधी चौक मूल येथील जिल्हा परिषद मुलांची प्रा.शाळेच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर !

इंटकचे जिल्हाध्यक्ष तथा प्रभारी नागपूर विभाग दत्तात्रय समर्थ व जिल्हा उपाध्यक्ष चेतन कामडे यांनी केली प्रशासनाची लक्षवेधी..
मूल : येथील गांधी चौक परिसरातील जिल्हा परिषद मुलांची प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रश्न भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) च्या वतीने ऐरणीवर आणण्यात आला आहे. इंटकचे जिल्हाध्यक्ष तथा प्रभारी नागपूर विभाग दत्तात्रय समर्थ आणि जिल्हा उपाध्यक्ष चेतन कामडे यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधत प्रशासनाकडे विद्यार्थ्यांच्या हितासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

शाळेतील विद्यार्थ्यांना आरोग्यदायी, स्वच्छ आणि सुरक्षित शैक्षणिक वातावरण मिळणे आवश्यक आहे. मात्र, शाळेतील मूलभूत सुविधांच्या प्रश्नांमुळे विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचे इंटकच्या वतीने नमूद करण्यात आले आहे.
🔴नऊ प्रमुख मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.
इंटकच्या वतीने गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, मूल यांना निवेदन देऊन विद्यार्थ्यांसाठी वापरण्यायोग्य स्वच्छतागृह, शुद्ध पिण्याचे पाणी, आधुनिक अध्यापनासाठी एलईडी टीव्ही, शाळेभोवती संरक्षण भिंत आणि शालेय पोषण आहारासाठी स्वतंत्र स्वच्छ स्वयंपाकगृह उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच, मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासासाठी क्रीडा साहित्य आणि शाळेतील शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी साऊंड स्पीकर व माईकची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
शाळेतील जुन्या इमारतीची तांत्रिक तपासणी करून ती धोकादायक असल्याचे आढळल्यास नियमानुसार निर्लेखित करून पाडण्यात यावी. त्यानंतर परिसर स्वच्छ करून विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी सुरक्षित जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
🔴शाळेची प्रत्यक्ष पाहणी करून निधी उपलब्ध करावा.
संबंधित अधिकाऱ्यांनी शाळेची प्रत्यक्ष पाहणी करावी, आवश्यक सुविधांसाठी प्रस्ताव तयार करावा आणि निधीची तरतूद करून मागण्यांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी इंटकने केली आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांचे आरोग्य, स्वच्छता आणि सुरक्षितता यांना प्राधान्य देणे आवश्यक असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी निवेदन सादर करतांना इंटकचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय समर्थ, जिल्हाउपाध्यक्ष चेतन कामडे, जिल्हा सचिव प्रफुल वज्जलवार, जिल्हा सहसचिव सतीश सुंकरवार, आणि मूल शहर उपाध्यक्ष साईनाथ जिडगेलवार तसेच इंटकचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन विद्यार्थ्यांच्या हितासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अन्यथा या प्रश्नांच्या निराकरणासाठी वरिष्ठ प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असा इशाराही भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) च्या वतीने देण्यात आला आहे.
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
चंद्रपूर जिल्ह्यातील नवनवीन बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा..
श्री. चेतन म. कामडे
न्यूज जागर चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी.
संपर्क. मो. 9307553014
⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕

