
रुग्णांना फळवाटप; मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांसोबत साजरा केला आनंदाचा क्षण.

अमोल मारकवार | तालुका प्रतिनिधी
अहेरी:- अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांचे लहान बंधू, युवानेते कुमार अवधेशराव बाबा आत्राम यांचा आज वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. वाढदिवसाचा आनंद केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप केले. तसेच मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांना फळे व बिस्किटांचे वाटप करून त्यांच्यासोबत वाढदिवस साजरा केला.

या निमित्ताने उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करताना कुमार अवधेशराव बाबा आत्राम यांनी रुग्णांच्या तब्येतीची आस्थेने विचारपूस केली. त्यांच्या प्रकृतीची माहिती घेत त्यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांना फळे व बिस्किटांचे वाटप करून त्यांनी विद्यार्थ्यांसोबत आनंदाचे क्षण घालवले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला.
वाढदिवसाच्या निमित्ताने गरजू आणि रुग्णांसोबत आनंद वाटून घेत सामाजिक सेवेचा आदर्श जपण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. समाजातील गरजू घटकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवून वाढदिवस साजरा करण्याच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
यावेळी भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

