
दोन स्कॉर्पिओंसह देशी दारू आणि सात मोबाईल हस्तगत; सहा आरोपी अटकेत, तीन जणांचा शोध सुरू

एटापल्ली, दि. २९ ऑक्टोबर २०२६ : अवैध देशी दारूची वाहतूक आणि वितरण करणाऱ्या कथित तस्करीच्या जाळ्याविरोधात एटापल्ली पोलिसांनी मध्यरात्री धडक कारवाई केली. जिवनगट्टा–बारसेवाडा मार्गावर सापळा रचून पोलिसांनी दोन स्कॉर्पिओ वाहने आणि मोठ्या प्रमाणातील देशी दारू जप्त केली. तसेच, शेतातील झोपडीत साठवून ठेवलेली दारू आणि सात मोबाईल फोन असा एकूण २७ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणात सहा आरोपींना अटक करण्यात आली असून, अन्य तीन आरोपी अंधाराचा फायदा घेऊन जंगलाच्या दिशेने पसार झाल्याने त्यांचा शोध सुरू आहे. या कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू वाहतूक आणि वितरणाच्या प्रकारावर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १२.०५ वाजताच्या सुमारास जिवनगट्टा येथे स्कॉर्पिओ वाहनातून अवैध दारू आणली जाणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर जिवनगट्टा–बारसेवाडा रस्त्यावरील एका गल्लीत पोलिसांनी सापळा रचला. काही वेळातच पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ (क्रमांक MH 31 DC 6816) आणि त्यानंतर काळ्या रंगाची स्कॉर्पिओ एन (क्रमांक CG 05 AQ 1326) घटनास्थळी पोहोचली. पांढऱ्या वाहनातील दारूच्या पेट्या काळ्या वाहनात भरल्या जात असताना पोलिसांनी दोन्ही बाजूंनी घेराव घातला. पोलिसांची वाहने दिसताच संबंधितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र पांढरी स्कॉर्पिओ रिव्हर्स घेताना नालीत अडकली, तर काळ्या वाहनासमोर पोलिसांनी वाहन उभे केल्याने त्यांना पळ काढता आला नाही. त्यानंतर दोन्ही वाहने ताब्यात घेऊन तपासणी करण्यात आली.

या कारवाईत पांढऱ्या स्कॉर्पिओमधून देशी दारूच्या १७ पेट्या, अंदाजे १ लाख ७० हजार रुपये किमतीच्या, तर वाहनाची किंमत ८ लाख रुपये असा एकूण ९ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. काळ्या स्कॉर्पिओ एनमधून रॉकेट देशी दारूच्या १४ पेट्या, अंदाजे १ लाख ४० हजार रुपये किमतीच्या, तसेच १५ लाख रुपये किमतीचे वाहन असा १६ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याशिवाय संतोष डोलू नरोटे यांच्या शेतातील झोपडीत ठेवलेल्या रॉकेट देशी दारूच्या नऊ पेट्या, किंमत ९० हजार रुपये, आणि अटक आरोपींकडील ७ मोबाईल फोन, किंमत ७० हजार रुपये, जप्त करण्यात आले. या सर्व मुद्देमालाची एकत्रित किंमत २७ लाख ७० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणात आकाश प्रशांत मुजुमदार (रा. एटापल्ली), अफसर शेख हुसेन (रा. नागपूर), प्रशांत बजरंग आंबटकर (रा.नंदुरी समुद्रपूर, जि. वर्धा), पंकज शामल बारई (रा. जांबिया गट्टा), तुषार मिहीर रॉय(पी. व्ही. 79 जनकपूर, ता. पखांजूर जि. कांकेर, छत्तीसगड ) आणि सुरत सत्यजित मंडल ( रा.पी. व्ही. 102 किसकनगर ता.पाखंजूर,जि. कांकेर, छत्तीसगड) यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, प्रशांत आंबटकर याने पंकज बारई याच्या सांगण्यावरून एटापल्ली येथील आकाश मुजुमदार याच्यासाठी दारू आणल्याचा आरोप आहे. तसेच, त्यापैकी २९ पेट्या संतोष डोलू नरोटे याला दिल्याची माहिती तपासात पुढे आल्याचे पोलिसांनी नमूद केले. संतोष नरोटे (जिवनगट्टा, एटापल्ली ) मिथुन निर्मल मलिक ( जांबिया गट्टा, एटापल्ली आणि गौरव प्रभाकर माकोडे ( जाम, चंद्रपुर ) हे तिघे घटनास्थळावरून जंगलाच्या दिशेने पसार झाल्याने त्यांचा शोध घेतला जात आहे.
संबंधित आरोपी संघटितपणे अवैध दारूची वाहतूक व वितरण करीत असल्याचा संशय आणि यापूर्वीच्या गुन्ह्यांची माहिती तपासात समोर आल्याने पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ११२ तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातील कलम ६५, ८३ आणि ९८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत लांबट करीत आहेत. ही कारवाई पीएसआय चंद्रकांत लांबट यांच्या नेतृत्वाखाली पोलीस शिपाई मोहन शिंदे, प्रवीण वैरागडे, रोशन पुराम, काशिनाथ मोहाटे, गणेश सोनटक्के, शिवा हरगिले आणि वासुदेव मडावी यांनी केली. पसार आरोपींचा शोध, दारूच्या पुरवठा साखळीची पडताळणी आणि या प्रकरणातील अन्य संभाव्य सहभागाची चौकशी पुढील तपासात महत्त्वाची ठरणार आहे.

