
एटापल्ली : पोलीस स्टेशन एटापल्लीच्या वतीने शनिवार, दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत भगवंतराव महाविद्यालय, एटापल्ली येथील प्राध्यापक डॉ. बाळकृष्ण डी. कोंगरे यांनी सहभाग नोंदवत तब्बल ६ किलोमीटर धावण्याची कामगिरी केली.

वयाच्या ५६ व्या वर्षी त्यांनी दाखविलेली जिद्द, उत्साह आणि शारीरिक तंदुरुस्ती उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरली. मॅरेथॉन यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप बर्गे व पोलीस निरीक्षक मच्छिंद्र नागरगोजे यांनी त्यांचे विशेष अभिनंदन करून त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले.
या स्पर्धेत विविध शाळा, महाविद्यालये तसेच शासकीय कार्यालयांमधील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विजेत्या धावपटूंना पोलीस स्टेशन इटापल्लीच्या वतीने बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

या उपक्रमाच्या माध्यमातून सहभागी धावपटूंना नवी ऊर्जा व प्रोत्साहन मिळाले. तसेच युवकांसह सर्व वयोगटांतील नागरिकांमध्ये आरोग्य, व्यायाम आणि क्रीडा संस्कृतीची आवड निर्माण करण्याचा सकारात्मक संदेश देण्यात आला.
वयाच्या ५६ व्या वर्षी ६ किलोमीटर धावण्याची कामगिरी करून प्रा. डॉ. बाळकृष्ण कोंगरे यांनी ‘वय हा अडथळा नसून इच्छाशक्ती महत्त्वाची असते’ हे आपल्या कृतीतून सिद्ध केले.

