
नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी

कोरची तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी व परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कापणीला आलेले धानपीक पावसामुळे भुईसपाट झाले असून, शेतात कापून ठेवलेले धान भिजल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष सदराम मडावी यांनी तहसीलदार कोरची यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, कोरची तालुक्यातील अनेक गावांमध्ये अवकाळी व परतीच्या पावसामुळे धानपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कापणीसाठी तयार असलेले धानपीक पावसाच्या तडाख्याने जमिनीवर पडले असून, कापणी करून शेतात ठेवलेले धान भिजल्याने त्याची गुणवत्ता खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत असून, त्यांच्यासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.

या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सर्व बाधित गावांमध्ये महसूल विभाग, कृषी विभाग व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त पथकांमार्फत तातडीने प्रत्यक्ष शेतशिवारात जाऊन पंचनामे करण्यात यावेत. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या नियमांनुसार लवकरात लवकर नुकसानभरपाई मंजूर करून ती त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, गडचिरोली आणि उपविभागीय अधिकारी, कुरखेडा यांनाही पाठविण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांचे नुकसान गंभीर स्वरूपाचे असल्याने प्रशासनाने विलंब न करता तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे

