
नितेश गट्टीवार| जिल्हा प्रतिनिधी

गडचिरोली (चामोर्शी ): तालुक्यातील येणापूर-जयरामपूर परिसरात प्रस्तावित एमआयडीसीसाठी करण्यात येणाऱ्या भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांचा संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत आहे. आपल्या हक्काच्या जमिनी वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ठिय्या आंदोलनाचा आज दि.३१ ऑक्टोबर रोजी तिसरा दिवस असून, या आंदोलनस्थळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी भेट देत आंदोलक शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला.
यावेळी आमदार डॉ. नरोटे यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या समस्या, भावना आणि प्रमुख मागण्या जाणून घेतल्या. प्रस्तावित एमआयडीसीसाठी होणाऱ्या भूसंपादनामुळे पिढ्यान्पिढ्या कसत असलेल्या जमिनी हातातून जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. शेती हाच उदरनिर्वाहाचा प्रमुख आधार असल्याने जमीन गेल्यास कुटुंबांच्या भवितव्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार असल्याची व्यथा आंदोलकांनी मांडली.

‘विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी हिरावून घेऊ नका!’ अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांची संमती, त्यांच्या हक्कांचा विचार आणि त्यांच्या भविष्याची सुरक्षितता यांना प्राधान्य मिळाले पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या व्यथा आणि प्रश्न समजून घेत आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी आंदोलकांशी चर्चा केली. दरम्यान, भूसंपादनाच्या मुद्द्यावर शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम असून, तिसऱ्या दिवशी आंदोलन सुरूच आहे.
शेतजमीन वाचविण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरले असून, येणापूर-जयरामपूरमधील हा संघर्ष आता केवळ जमिनीपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा आणि पुढील पिढ्यांच्या भविष्याचा प्रश्न बनला आहे. त्यामुळे या आंदोलनाकडे संपूर्ण चामोर्शी तालुक्याचे लक्ष लागले आहे.

