
मूल नगरपरिषदेतील पाणीपुरवठा कंत्राटी कामगारांचे रुद्राक्ष डेव्हलोपर्स चंद्रपूर च्या कंत्राटदारा विरोधात काम बंद आंदोलन; २ नोव्हेंबरपासून ठिय्या आंदोलनाचा इशारा… कामगारांच्या आंदोलनाला इंटक चा पाठिंबा जाहीर…

मूल : मूल नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागात कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासन व संबंधित कंत्राटदाराकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत कामगारांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आपल्या न्याय्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी सोमवार, दिनांक २ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून मूल नगरपरिषद कार्यालयासमोर काम बंद करून ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय कामगारांनी घेतला आहे.
पाणीपुरवठा विभागातील कंत्राटी कामगारांच्या मागण्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. यासंदर्भात वारंवार निवेदने देऊनही कोणताही ठोस निर्णय झालेला नसल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, मूल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा करण्यासाठी वारंवार प्रयत्न करूनही मुख्याधिकारी यांचे कडून पण सकारात्मक प्रतिसाद मिळला नसल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. तसेच संबंधित कंत्राटदारही कामगारांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी पुढाकार घेत नसल्याने कामगारांमध्ये नाराजी वाढली आहे.

कामगारांच्या प्रमुख मागण्यांमध्ये लागू किमान वेतन, बोनस, भविष्य निर्वाह निधी (PF), ईएसआयसी (ESIC) व इतर कायदेशीर लाभ मिळणे, तसेच कामगारांच्या रोजगाराला सुरक्षा देणे यांचा समावेश आहे. आंदोलनात सहभागी झाल्यामुळे कोणत्याही कामगाराला कामावरून कमी करू नये किंवा त्याच्यावर अन्याय करू नये, अशीही मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या आंदोलनामुळे मूल शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये, याची जाणीव कामगारांनी व्यक्त केली असून, पाणीपुरवठा सेवा देणाऱ्या कामगारांनाच न्याय मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
या आंदोलनासंदर्भात पोलीस स्टेशन मूल, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय तसेच नगरपरिषद कार्यालय येथे आवश्यक अर्ज व पूर्वसूचना देण्यात आल्याचे कामगारांनी सांगितले आहे.
शासनाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून मुख्याधिकारी, संबंधित कंत्राटदार आणि कामगार संघटनेच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक आयोजित करावी, कामगारांच्या मागण्यांवर लेखी निर्णय घ्यावा आणि रोजगाराची सुरक्षा सुनिश्चित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
२ नोव्हेंबरपूर्वी कामगारांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा निघाला नाही, तर काम बंद ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कामगारांनी दिला आहे.
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
चंद्रपूर जिल्ह्यातील नवनवीन बातम्या व दिवाळी व नवीन वर्षाच्या जाहिरातीसाठी संपर्क करा…
श्री. चेतन म. कामडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी न्यूज जागर…
संपर्क मो. 9307553014
🟧🔴🟧🔴🟧🔴🟧🔴🟧🔴🟧🔴🟧🔴🟧🔴🟧

