
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार करून १ महिना १० दिवस उलटले; अद्याप न्याय नाही

न्याय न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा पालकांचा इशारा
चामोर्शी,दि.१ नोव्हेंबर : प्रवेश परीक्षेत गुणवत्ता सिद्ध करूनही जवाहर नवोदय विद्यालय, घोट येथील इयत्ता सहावीच्या प्रवेशापासून वंचित राहिल्याचा आरोप करत पियुष कालिदास पोरटे यांच्या पालकांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. ओव्हरऑल रँक ५३ मिळूनही अंतिम निवड यादीत मुलाचे नाव नसल्याने प्रवेश प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह शिक्षणाधिकारी, जिल्हाधिकारी आणि जवाहर नवोदय विद्यालय प्रशासनाकडे लेखी तक्रारी करूनही तब्बल १ महिना १० दिवस उलटले, तरी न्याय मिळाला नसल्याचा आरोप पालक कालिदास रामदास पोरटे यांनी पत्रकार परिषदेत केला.

रँक ५३ असताना निवड का नाही?
पियुष कालिदास पोरटे याने जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता सहावीच्या प्रवेश परीक्षेत सहभाग घेतला होता. या परीक्षेत त्याला ओव्हरऑल रँक ५३ मिळाल्याचे पालकांचे म्हणणे आहे. मात्र, अंतिम निवड यादीत त्याचे नाव समाविष्ट करण्यात आले नाही. दुसरीकडे, रँक ५४ असलेल्या विद्यार्थ्याला प्रवेश मिळाल्याचा दावा पालकांनी केला आहे. त्यामुळे गुणवत्ता यादी आणि अंतिम निवड यादीतील या कथित विसंगतीमागील नेमके कारण काय, असा सवाल उपस्थित होत आहे.
नवोदय प्रवेश प्रक्रियेत ग्रामीण-शहरी प्रवर्ग, आरक्षण आणि इतर निर्धारित निकष लागू असतात. त्यामुळे पियुषची निवड कोणत्या कारणामुळे झाली नाही आणि त्याच्यापेक्षा कमी रँक असलेल्या विद्यार्थ्याला कोणत्या निकषांवर प्रवेश देण्यात आला, याची अधिकृत माहिती प्रशासनाने द्यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.
चार प्रमुख कार्यालयांकडे तक्रार; तरीही कार्यवाही नाही!
या प्रकरणात पालक कालिदास पोरटे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, जिल्हाधिकारी तसेच जवाहर नवोदय विद्यालय प्रशासनाकडे लेखी निवेदन देऊन प्रवेश प्रक्रियेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करून १ महिना १० दिवसांचा कालावधी लोटला असूनही अद्याप कोणताही ठोस न्याय मिळालेला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
प्रवेश प्रक्रियेतील आरक्षणाचे निकष, अंतिम निवड यादी तयार करण्याची पद्धत, विद्यार्थ्यांचे रँक आणि निवडीचे निकष यांची निष्पक्ष पडताळणी करण्यात यावी. तसेच पियुष पोरटे याच्या प्रवेशाबाबत प्रशासनाने स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
न्याय न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण!
प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही प्रश्न मार्गी लागत नसल्याने आता पालकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. पियुषला न्याय मिळाला नाही आणि या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाली नाही, तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर परीवारासह आमरण उपोषणाला बसणार असल्याचे कालिदास रामदास पोरटे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
गुणवंत विद्यार्थ्याच्या भविष्याचा प्रश्न ऐरणीवर!
एका विद्यार्थ्याच्या प्रवेशाचा प्रश्न केवळ एका कुटुंबापुरता मर्यादित नसून प्रवेश प्रक्रियेच्या पारदर्शकतेशी संबंधित आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने या तक्रारीकडे गांभीर्याने लक्ष देऊन वस्तुस्थिती जनतेसमोर आणणे गरजेचे आहे. पियुषच्या प्रवेशाबाबत नेमके काय घडले, निवड यादीत त्याचे नाव का आले नाही आणि पालकांच्या तक्रारीवर अद्याप कार्यवाही का झाली नाही, या प्रश्नांची उत्तरे आता प्रशासनाला द्यावी लागणार आहेत.
या पत्रकार परिषदेला कालिदास पोरटे, वाघोली यांच्यासह राहुल पोरटे (माजी उपसरपंच, वाघोली), निलम पोरटे, स्वप्निल चिंतलवार, आझाद समाज पक्षाचे प्रतीक खोब्रागडे आदी उपस्थित होते.
आता तरी प्रशासन जागे होणार का? पियुषला न्याय मिळणार का? की पालकांना आपल्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागणार? याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
प्रतिक्रिया –पोर्टलवरून प्रवेश होत असल्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांचे प्रवेश हे पोर्टलच्या यादीनुसारच आमच्या स्तरावरून देण्यात आले आहे प्रवेश देण्याची प्रक्रिया आमच्या स्तरावरून होत नसल्याने संबंधितांनी वरच्या स्तरावरून न्याय मागावे.
राजन गजभे,उपप्राचार्य जवाहर नवोदय विद्यालय घोट.

