
ग्रामसेवकाची तात्काळ चौकशी करून कारवाई करा; अन्यथा पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडणार!

चामोर्शी,दि.१ नोव्हेंबर: चामोर्शी तालुक्यातील जामगिरी ग्रामपंचायतीच्या कारभारावरून ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, ग्रामसेवकाच्या कथित मनमानी आणि हलगर्जीपणामुळे गावातील विकासकामे ठप्प झाली आहेत. सामान्य नागरिकांना शासकीय दाखले मिळविण्यासाठी वारंवार ग्रामपंचायतीचे उंबरठे झिजवावे लागत असूनही दाखले मिळत नसल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत देत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
जामगिरी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी (ग्रामसेवक) रवी मडावी हे ग्रामपंचायतीत नियमित उपस्थित राहत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे नागरिकांना विविध शासकीय कामांसाठी आवश्यक असलेले दाखले मिळविताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामसेवकाच्या अनुपस्थितीमुळे गावातील विकासकामांनाही खीळ बसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

पाणीपुरवठा बंद, नागरिकांची पाण्यासाठी भटकंती!
ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा योजनेचे वीजबिल थकीत ठेवल्यामुळे महावितरणने वीजजोडणी खंडित केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
परिणामी मागील सात दिवसांपासून गावातील पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ऐन सणासुदीच्या काळात निर्माण झालेल्या या पाणीटंचाईमुळे ग्रामस्थांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
घरटॅक्स वसुली होते, मात्र स्वच्छतेवर खर्च नाही!
गावातील घरटॅक्स जमा करूनही नाली व गटारांच्या स्वच्छतेसाठी निधीचा योग्य वापर होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. नळ पाणीपुरवठा अचानक बंद झाल्याने गृहिणींचे हाल होत आहेत. याशिवाय गावातील पथदिवे (स्ट्रीट लाईट्स) बंद असल्याने रात्रीच्या वेळी ग्रामस्थांना अंधाराचा आणि सुरक्षेचा सामना करावा लागत आहे.
या समस्यांबाबत ग्रामस्थांनी अनेकदा तोंडी व लेखी स्वरूपात विनंती करूनही ग्रामसेवकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला. उलट चौकशीसाठी जाणाऱ्या ग्रामस्थांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचेही पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करूनही संबंधित ग्रामसेवकावर कोणतीही कारवाई झाली नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.
ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या
संबंधित ग्रामसेवकाची तात्काळ चौकशी करून त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, गावातील प्रलंबित विकासकामे व नागरिकांना आवश्यक असलेले दाखले तात्काळ मार्गी लावावेत.ग्रामपंचायतीमध्ये बायोमेट्रिक हजेरी किंवा ग्रामसेवकांसाठी निश्चित उपस्थितीची वेळ ठरवून द्यावी.
अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा!
पुढील ७ ते १५ दिवसांत संबंधित प्रशासनाने या समस्यांवर ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर सर्व ग्रामस्थांच्या वतीने तालुका पंचायत समिती अथवा जिल्हा परिषद कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जामगिरी येथील प्रशांत वाढई, जितेंद्र कुळमेथे, भाग्यश्री मडावी, उर्मिला कोवे, प्रशांत फुलझेले, पूजा कोवे, अक्षय शेंडे सुधीर निकुरे, मायाबाई झोडे ,अनिता शेंडे , शेरखान पठाण आदी ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेद्वारे दिला आहे.
आता जामगिरी ग्रामपंचायतीतील या गंभीर समस्यांची प्रशासन कितपत दखल घेते आणि संबंधित ग्रामसेवकावर काय कारवाई होते, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.
——
सदर प्रतिनिधीने जामगिरीचे ग्रामसेवक रवी मडावी यांचेशी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.

