
‘मुख्यमंत्र्यांची भेट नको, आधी एमआयडीसीचा प्रस्ताव रद्द करा!’ शेतकऱ्यांचा शासनाला ठाम इशारा

नितेश गट्टीवार|गडचिरोली
चामोर्शी(आष्टी),दि.३ नोव्हेंबर : एका बाजूला मेघराजाच्या मुसळधार सरी, तर दुसऱ्या बाजूला आपल्या काळ्या आईची जमीन वाचविण्यासाठी रस्त्यावर उतरलेले शेतकरी! पावसाच्या प्रत्येक सरीसोबत शेतकऱ्यांचा संताप अधिकच तीव्र होत असून, आष्टीतील एमआयडीसी जमीन अधिग्रहणविरोधी आंदोलनाने आता आक्रमक वळण घेतले आहे.

दि. २ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सुरू झालेले रास्ता रोको आंदोलन तब्बल २६ तासांनंतरही सुरूच आहे. ‘आमची जमीन वाचवा, एमआयडीसी हटवा!’ या घोषणांनी परिसर दणाणून गेला असून, कोणत्याही परिस्थितीत जमीन अधिग्रहण होऊ देणार नाही, असा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे.
पावसात भिजले, पण निर्धार मात्र ढळला नाही!
आंदोलनादरम्यान पावसाने हजेरी लावली; मात्र शेतकऱ्यांच्या आंदोलनाची धग कमी झाली नाही. अनेक शेतकरी भर पावसातही रस्त्यावर ठाण मांडून बसले आहेत. शेती ही केवळ जमिनीचा तुकडा नसून पिढ्यान्पिढ्यांच्या कष्टांची शिदोरी आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा एकमेव आधार आहे. अशा जमिनी एमआयडीसीच्या नावाखाली हिरावून घेण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, अशी आक्रमक भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.
दोन दिवसांपासून वाहतुकीचा खोळंबा; वाहनांच्या रांगा!
आंबेडकर चौकातील रास्ता रोकोमुळे आष्टी परिसरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून प्रवासी, वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाने मोठा बंदोबस्त तैनात केला असून आंदोलनस्थळी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीचे आश्वासनही निष्फळ; शेतकऱ्यांचा पवित्रा बदलला!
आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची मुख्यमंत्री यांच्यासोबत भेट घडवून आणण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप अपेक्षित भेट न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता केवळ आश्वासनांवर समाधान मानण्यास शेतकरी तयार नाहीत.
‘मुख्यमंत्र्यांची भेट नको, आधी एमआयडीसीचा प्रस्ताव रद्द करा!’ अशी ठाम भूमिका घेत आंदोलकांनी शासनासमोर थेट आव्हान उभे केले आहे. चर्चेच्या नावाखाली वेळकाढूपणा नको, तर जमीन अधिग्रहणाचा प्रस्तावच कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय जाहीर करा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
गणपूर, जयरामपूर, मुधोलीचे शेतकरीही मैदानात!
या आंदोलनाला आता व्यापक जनसमर्थन मिळू लागले आहे. गणपूर, जयरामपूर आणि मुधोली परिसरातील शेतकऱ्यांनीही आष्टीत दाखल होत आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दिला आहे. त्यामुळे एमआयडीसीविरोधातील लढा केवळ एका गावापुरता मर्यादित न राहता संपूर्ण परिसरातील शेतकऱ्यांचा सामूहिक लढा बनत चालला आहे.
येनापूर-जयरामपूर येथील आंदोलनानंतर आष्टीतही शेतकऱ्यांनी रास्ता रोकोचे हत्यार उपसल्याने एमआयडीसी जमीन अधिग्रहणाचा प्रश्न अधिकच चिघळला आहे.
जमीन वाचल्याशिवाय माघार नाही; आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा!
शासनाने तातडीने हस्तक्षेप करून एमआयडीसीसाठी प्रस्तावित जमीन अधिग्रहणाचा निर्णय रद्द करावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
एकीकडे पावसाचा मारा, दुसरीकडे वाहतुकीचा खोळंबा आणि तिसरीकडे शेतकऱ्यांचा वाढता आक्रोश, अशा तिहेरी कोंडीत प्रशासन सापडले आहे.
आता प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या भेटीचा राहिलेला नाही, तर शेतकऱ्यांच्या जमिनी वाचविण्याच्या निर्णयाचा आहे! आष्टीतील आंदोलनाची धग शासनापर्यंत पोहोचणार का? शेतकऱ्यांच्या मागणीपुढे सरकार नमते घेणार की हा संघर्ष आणखी चिघळणार? याकडे संपूर्ण चामोर्शी तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

