
जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांची भेट; खरेदी केंद्र तातडीने सुरू करण्याची जोरदार मागणी

जिल्हा प्रतिनिधी | गडचिरोली :
शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य वेळी खरेदीची व्यवस्था उपलब्ध व्हावी आणि त्यांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागू नये, यासाठी धान्य खरेदी केंद्र तातडीने सुरू करण्याची मागणी आमदार रामदास मसराम यांनी केली आहे.

यासंदर्भात आमदार रामदास मसराम यांनी जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांची भेट घेऊन धान्य खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत सविस्तर चर्चा केली. शेतकऱ्यांच्या धान्याची वेळेत खरेदी होणे अत्यंत आवश्यक असून खरेदी केंद्र सुरू होण्यास विलंब झाल्यास शेतकऱ्यांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरू करण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.
धान्य खरेदी केंद्र वेळेत सुरू झाल्यास शेतकऱ्यांना आपला शेतमाल विक्री करण्यासाठी दिलासा मिळणार असून धान्य विक्रीसाठी होणारी धावपळ आणि संभाव्य अडचणी टाळता येतील. शेतकऱ्यांच्या हिताशी निगडित या महत्त्वपूर्ण प्रश्नावर प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी भूमिका आमदार मसराम यांनी मांडली.
यावेळी जिल्ह्यातील इतरही विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करून संबंधित प्रश्न प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे हित हाच आमचा प्राधान्यक्रम! शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याची भूमिका आमदार रामदास मसराम यांनी घेतली आहे.

