
जिल्हा प्रतिनिधी|गडचिरोली

चामोर्शी: येणापूर-जयरामपूर परिसरातील प्रस्तावित स्टील प्रकल्पाच्या भूसंपादनाविरोधात 13 गावांतील शेतकऱ्यांनी आष्टी येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३-सी वर सुरू केलेल्या चक्काजाम व ठिय्या आंदोलनाला अखेर मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर यशस्वी तोडगा निघाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी अनिरुद्ध पालकर यांनी मध्यरात्री आंदोलनस्थळी धाव घेत शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या आणि मुख्यमंत्र्यांचा निरोप आंदोलनकर्त्यांपर्यंत पोहोचवला.
येणापूर-जयरामपूर परिसरात प्रस्तावित असलेल्या स्टील प्रकल्पासाठी करण्यात येणाऱ्या जमीन अधिग्रहणाला 13 गावांतील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. प्रकल्पासाठी आपल्या जमिनींचे भूसंपादन करू नये, या प्रमुख मागणीसाठी शेतकऱ्यांनी आष्टी येथे राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम व ठिय्या आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनामुळे चंद्रपूर, गडचिरोली तसेच दक्षिण गडचिरोलीकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता.

मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप; मध्यरात्री विशेष कार्य अधिकारी आंदोलनस्थळी!
आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेतली. त्यांनी आपले विशेष कार्य अधिकारी अनिरुद्ध पालकर यांना आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पालकर यांनी मध्यरात्री आंदोलनस्थळी भेट देत शेतकऱ्यांशी सविस्तर संवाद साधला. शेतकऱ्यांच्या भावना, अडचणी आणि भूसंपादनाबाबतच्या मागण्या जाणून घेतल्या. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यासाठी आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले.
पालकर यांनी मुख्यमंत्र्यांचा निरोप शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि महामार्गावरील आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला.
भूसंपादन प्रक्रिया तूर्त स्थगित; शेतकऱ्यांना मोठा दिलासा!
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा होईपर्यंत संबंधित भूसंपादन प्रक्रिया स्थगित ठेवण्यात आली आहे. सध्या या संदर्भात कोणतीही पुढील कार्यवाही सुरू नसल्याचे सहपालकमंत्री अशिष जयस्वाल तसेच जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
स्थानिक आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनीही आंदोलनाच्या आदल्या दिवशी शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले होते.
मुख्यमंत्र्यांच्या थेट हस्तक्षेपामुळे आणि विशेष कार्य अधिकारी अनिरुद्ध पालकर यांच्या मध्यस्थीमुळे महामार्गावरील आंदोलन तूर्त शांत झाले असले, तरी स्टील प्रकल्पासाठी प्रस्तावित जमीन अधिग्रहणाचा प्रश्न अद्याप कायम आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री आणि शेतकरी यांच्यात होणाऱ्या चर्चेकडे 13 गावांतील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

