
नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली (चामोर्शी), दि. २० सप्टेंबर : तालुक्यातील मुरखळाचक येथे पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरशः धुमाकूळ घालत एकाच वेळी सात जणांना चावा घेतल्याची धक्कादायक घटना रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, कुत्र्याच्या हल्ल्यात सातही जण गंभीर जखमी झाले आहेत.
या घटनेत विलास रामदास रोहनकर (वय ५२), धनराज रोहनकर (७८), पत्रुजी किसन घोडे (६५), मयूर गिरीधर शेंद्रे (२४), ध्रुव तुकाराम ठेमसकर (५४), शामराव बालाजी कुणघाटकर (५५) आणि शिलाबाई डोमु गोवर्धन (४०) हे सर्व मुरखळाचक, ता. चामोर्शी येथील रहिवासी जखमी झाले.

कुत्र्याने अचानक हल्ला केल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. जखमींना तातडीने ग्रामीण रुग्णालय, चामोर्शी येथे दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. मयंक करमणकर यांनी जखमींवर प्राथमिक उपचार केले. सर्व जखमींना अँटी-रेबीज व्हॅक्सिन देण्यात आले. मात्र, रुग्णालयात आवश्यक रेबीज इम्युनोग्लोब्युलिन (सिरम) उपलब्ध नसल्याने सातही जखमींना पुढील उपचारासाठी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले.
सिरम उपलब्ध नसल्याने रुग्णांना गडचिरोली येथे हलवावे लागत असल्याची माहिती डॉ. मयंक करमणकर यांनी दिली.
आरोग्य सुविधांवर नागरिकांचा सवाल
चामोर्शी हा गडचिरोली जिल्ह्यातील मोठ्या तालुक्यांपैकी एक असून तालुक्याची लोकसंख्याही मोठी आहे. अशा परिस्थितीत कुत्रा चावल्यासारख्या तातडीच्या आरोग्यविषयक परिस्थितीत आवश्यक सिरम उपलब्ध नसणे ही बाब चिंताजनक असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना उपचारासाठी गडचिरोलीपर्यंत धाव घ्यावी लागत असल्याने आरोग्य विभागाने याची गांभीर्याने दखल घ्यावी, चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात अँटी-रेबीज व्हॅक्सिनसोबत आवश्यक सिरमचा पुरेसा साठा कायम उपलब्ध ठेवावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी संबंधित यंत्रणेने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी जोर धरत आहे

