
नितेश गट्टीवार |जिल्हा प्रतिनिधी |गडचिरोली
चामोर्शी : तालुकास्तरीय अंडर-१९ कबड्डी स्पर्धेत शिवाजी हायस्कूल, चामोर्शीच्या मुलांनी दमदार खेळाचे प्रदर्शन करत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. उत्कृष्ट सांघिक खेळ, आक्रमक चढाया आणि भक्कम बचावाच्या जोरावर संघाने प्रतिस्पर्ध्यांवर मात करत विजेतेपदाला गवसणी घातली.
संपूर्ण स्पर्धेत शिवाजी हायस्कूलच्या खेळाडूंनी आत्मविश्वासपूर्ण आणि शिस्तबद्ध खेळ करत आपल्या कौशल्याची छाप उमटवली. निर्णायक सामन्यातही खेळाडूंनी संयम राखत आक्रमण व बचावाचा सुरेख मेळ साधला आणि तालुक्यात अव्वल स्थान मिळवून शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला.

या उल्लेखनीय यशाबद्दल प्राचार्य धिरेंद्र चौधरी, उपप्राचार्य शाम भर्रे तसेच क्रीडा शिक्षक राकेश खेवले यांनी विजयी संघातील सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले. खेळाडूंच्या मेहनतीचे, सातत्यपूर्ण सरावाचे आणि संघभावनेचे कौतुक करत त्यांनी पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.
शिवाजी हायस्कूलच्या या यशामुळे चामोर्शी तालुक्यात क्रीडाप्रेमी आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, “शिवाजी हायस्कूलचा डंका” पुन्हा एकदा तालुक्यात घुमला आहे.

