
नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
(चामोर्शी),दि.१९ सप्टेंबर :
चामोर्शी तालुक्यातील रेगडी-हळदवाही जिल्हा परिषद क्षेत्रातील मौजा पलासपूर येथे अनुकूल ठाकूर सत्संग सेवा मंडळ, जिल्हा गडचिरोली यांच्या वतीने तालनवमी सप्ताहानिमित्त उद्या, रविवार दि. २० सप्टेंबर रोजी भव्य सत्संग समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यामुळे पलासपूर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून जिल्हाभरातील अनुकूल ठाकूर भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

या भव्य सत्संग समारोहात दुपारी ३ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत राज्यासह परराज्यातील मान्यवर सत्संगींच्या उपस्थितीत सत्संग, प्रवचन व आध्यात्मिक मार्गदर्शनाचा कार्यक्रम होणार आहे. या माध्यमातून उपस्थित भक्तांना आध्यात्मिक विचारांची तसेच सत्संगाची अनुभूती मिळणार आहे.
मान्यवरांचा जाहीर सत्कार
या सत्संग समारोहाचे आणखी एक प्रमुख आकर्षण म्हणजे मान्यवरांचा जाहीर सत्कार. गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार डॉ. अशोक नेते, गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे तसेच राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रणय खुणे यांचा अनुकूल ठाकूर सत्संग सेवा मंडळाच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.
सत्संग समारोहानंतर समस्त भक्तजन, मान्यवर व उपस्थित पाहुण्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला भक्तांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या भव्य धार्मिक व आध्यात्मिक सोहळ्यास जिल्ह्यातील अनुकूल ठाकूर भक्त, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सर्व आमंत्रित व निमंत्रित पाहुण्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर पलाश भाऊ घरामी, पंकज सेठ घरामी व अनुकूल ठाकूर सत्संग सेवा मंडळ, जिल्हा गडचिरोली यांच्या वतीने करण्यात आले आहे.

