
चामोर्शीत पाणी व चारा टंचाईचा आढावा; अनधिकृत टिल्लू पंपांवर कारवाईचे आदेश, पाणीगळती २४ तासांत दुरुस्त करण्याचे निर्देश

नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली (चामोर्शी )| दि. ४ नोव्हेंबर :आगामी उन्हाळ्यात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ येऊ देऊ नका. संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच कंबर कसून गावनिहाय ठोस नियोजन करावे. टंचाईग्रस्त गावांची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक उपाययोजनांचे प्रस्ताव तातडीने तयार करावेत, असे स्पष्ट निर्देश गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार मिलिंद सगुणाबाई रामजी नरोटे यांनी प्रशासनाला दिले.

चामोर्शी येथील बालाजी सभागृह (मेनेवार हॉल) येथे सन २०२६-२७ मधील संभाव्य पाणी व चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर आयोजित तालुकास्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग, चामोर्शी यांच्या वतीने आयोजित या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार नरोटे होते.
अनधिकृत टिल्लू पंपांवर कारवाईचा बडगा!
बैठकीत पाणीटंचाई रोखण्यासाठी प्रशासनाला अनेक महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या. सार्वजनिक नळांना अनधिकृतपणे जोडलेले टिल्लू पंप तातडीने जप्त करावेत, पाणीपुरवठा योजनांमधील गळती २४ तासांच्या आत दुरुस्त करावी, शासनाच्या निर्देशानुसार १० टक्के पाणी कपातीची अंमलबजावणी करावी, तसेच पाणीपुरवठा योजनांची वीज देयके नियमित भरावीत, असे निर्देश देण्यात आले.
याशिवाय ग्रामपंचायतींनी पाणीपट्टी वसुलीला गती द्यावी, प्रत्येक ग्रामपंचायतीत जलसुरक्षकांची नियुक्ती करावी आणि पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता नियमित तपासावी, अशा सूचनाही आमदार नरोटे यांनी केल्या.
नियोजनातील हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही!
पाणीटंचाई निवारणासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही; मात्र प्रशासनाच्या नियोजनातील त्रुटींमुळे कोणत्याही गावात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होता कामा नये, असा स्पष्ट संदेश आमदार नरोटे यांनी दिला. केवळ कागदोपत्री नियोजन न करता प्रत्यक्ष गावात जाऊन समस्या जाणून घ्या आणि त्या तातडीने सोडवा. नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित व नियमित पिण्याचे पाणी मिळालेच पाहिजे, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी बजावले.
अधिकाऱ्यांची उपस्थिती, उपाययोजनांवर सविस्तर चर्चा
या बैठकीस उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, तहसीलदार तथा तालुकास्तरीय टंचाई आढावा समितीचे अध्यक्ष प्रशांत घोरुडे, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागाचे उपविभागीय अभियंता तथा समितीचे सदस्य सचिव रमेश वानखेडे यांच्यासह महावितरण, जलसंपदा, कृषी, पशुसंवर्धन व इतर संबंधित विभागांचे अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच आणि कर्मचारी उपस्थित होते.
आगामी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाणी व चाऱ्याचा प्रश्न गंभीर होऊ नये, यासाठी संभाव्य टंचाईग्रस्त गावांमध्ये वेळेत उपाययोजना पूर्ण करण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला. उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच पाणीटंचाईवर मात करण्याची तयारी करा आणि नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ येऊ देऊ नका, असा ठाम संदेश या बैठकीतून प्रशासनाला देण्यात आला.

