
‘विकसित गडचिरोली व्हिजन २०४७’च्या संकल्पनेला जिल्हाधिकाऱ्यांकडून कृतीची जोड; माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्याकडून अभिनंदन
नितेश गट्टीवार| जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली, दि. २० सप्टेंबर : गडचिरोली जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले असून, चार पर्यटन सर्किटच्या माध्यमातून दि. २३ ते २८ सप्टेंबरदरम्यान पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी अविशान्त पंडा यांच्या पुढाकारातून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे गडचिरोलीच्या पर्यटन क्षेत्राला नवी ओळख मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

गडचिरोलीच्या ‘आकांक्षित जिल्हा ते विकसित गडचिरोली व्हिजन २०४७’ या विकास संकल्पनेत पर्यटन क्षेत्राला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. जिल्ह्यातील निसर्गसंपदा, जंगल, जलस्रोत, ऐतिहासिक स्थळे, गड-किल्ले तसेच समृद्ध आदिवासी संस्कृतीच्या माध्यमातून पर्यटन विकासाची मोठी क्षमता असल्याचे यापूर्वीच्या कार्यशाळेत अधोरेखित करण्यात आले होते.
पर्यटनातून रोजगारनिर्मिती, स्थानिक युवकांना स्वयंरोजगाराच्या संधी आणि गडचिरोलीची स्वतंत्र पर्यटन ओळख निर्माण करण्यावर भर देण्याची भूमिका या संकल्पनेत मांडण्यात आली होती. आता जिल्हा प्रशासनाने पर्यटन सर्किट आणि महोत्सवाच्या माध्यमातून या विचारांना प्रत्यक्ष कृतीची जोड दिली आहे.
या उपक्रमाचे स्वागत करत ‘आकांक्षित जिल्हा ते विकसित गडचिरोली’ कृती/निर्माण समितीचे मुख्य प्रवर्तक, भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी जिल्हाधिकारी अविशान्त पंडा यांचे अभिनंदन केले.
“गडचिरोलीच्या पर्यटन विकासासाठी प्रशासनाने सुरू केलेला हा उपक्रम ‘विकसित गडचिरोली व्हिजन २०४७’च्या संकल्पनेशी सुसंगत आहे. पर्यटन महोत्सवामुळे जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना व्यापक प्रसिद्धी मिळून पर्यटकांची संख्या वाढण्यासोबतच स्थानिक नागरिकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील,” असा विश्वास डॉ. देवराव होळी यांनी व्यक्त केला.
गडचिरोलीच्या नैसर्गिक आणि सांस्कृतिक वैभवाची राज्यभर ओळख निर्माण करण्यासाठी पर्यटन महोत्सव महत्त्वपूर्ण ठरणार असून, स्थानिक नागरिक, युवक, पर्यटनप्रेमी आणि पर्यटकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. होळी यांनी केले आहे.
गडचिरोलीच्या विकासाच्या वाटचालीत पर्यटनाचा नवा अध्याय सुरू करण्याच्या दिशेने हा महोत्सव महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

