
खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी रेल्वे प्रशासनाकडे मांडल्या प्रवाशांच्या ज्वलंत समस्या
जिल्हा प्रतिनिधी |नितेश गट्टीवार
गडचिरोली: दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळासोबत नागपूर येथे झालेल्या बैठकीत गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातील रेल्वे प्रवाशांच्या विविध समस्यांचा मुद्दा खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी आक्रमकपणे मांडला. गोंदिया-बल्लारशाह रेल्वे गाडी नियोजित वेळेनुसार नियमित आणि वेळेत धावावी, तसेच गडचिरोली शहरातील राष्ट्रीयकृत बँकांमध्येही रेल्वे तिकीट आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी ठोस मागणी त्यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली.

गोंदिया-बल्लारशाह रेल्वे गाडी अनेकदा नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावत असल्याने विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी आणि नियमित प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. रेल्वेच्या विलंबामुळे प्रवाशांचे दैनंदिन वेळापत्रक विस्कळीत होत असून, त्यामुळे ही गाडी नियोजित वेळापत्रकानुसार सुरळीत व वेळेत चालविण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी डॉ. किरसान यांनी केली.
गडचिरोलीत बँकांमध्ये रेल्वे तिकीट सुविधा द्या
गडचिरोली शहरात रेल्वे तिकीट काढण्यासाठी पोस्ट कार्यालयामार्फत उपलब्ध असलेल्या सुविधेबाबतही प्रवाशांना येणाऱ्या अडचणी त्यांनी रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या. तिकीट काढण्यासाठी नागरिकांची गर्दी होत असल्याने अनेकदा वेळ आणि श्रम वाया जातात.
ही गैरसोय दूर करण्यासाठी गडचिरोली शहरातील राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखांमध्ये रेल्वे तिकीट आरक्षणाची सुविधा सुरू करावी, अशी मागणी खासदार डॉ. किरसान यांनी केली. यामुळे नागरिकांना आपल्या परिसरातच रेल्वे तिकीट मिळण्याची सुविधा उपलब्ध होऊन प्रवाशांची धावपळ कमी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
स्थानकांवरील सुविधांचाही मुद्दा ऐरणीवर
याशिवाय मतदारसंघातील महत्त्वाच्या स्थानकांवर आवश्यक त्या रेल्वे गाड्यांना थांबे देणे, स्थानकांवर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, प्रवाशांसाठी निवारा यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे, तसेच रेल्वे स्थानकांचा विकास व आधुनिकीकरण करण्याच्या मागण्याही बैठकीत मांडण्यात आल्या.
गडचिरोली-चिमूर मतदारसंघातील नागरिक मोठ्या प्रमाणावर रेल्वे सेवेचा वापर करतात. त्यामुळे रेल्वे गाड्या वेळेत धावणे, तिकीट व्यवस्था सुलभ होणे आणि स्थानकांवर प्रवाशांना आवश्यक सुविधा मिळणे अत्यंत गरजेचे आहे. प्रवाशांच्या समस्या गांभीर्याने घेऊन त्यावर तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी डॉ. नामदेव किरसान यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली.
या बैठकीस खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्यासह रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे, भंडारा-गोंदियाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे, खासदार राजेंद्रजी जैन, खासदार मायाताई इवनाते, बालाघाटच्या खासदार भारती पारधी तसेच नागपूर मंडळाच्या कार्यक्षेत्रातील अन्य संसद सदस्य व रेल्वे अधिकारी उपस्थित होते.

