
माजी खासदार डॉ. अशोक नेते यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्रांचे वितरण; गणरायाचे मनोभावे पूजन
नितेश गट्टीवार|गडचिरोली
चंद्रपूर (ब्रह्मपुरी), दि. २० सप्टेंबर : गणेशोत्सवाच्या भक्तिमय वातावरणाला सामाजिक बांधिलकीची जोड देत ब्रह्मपुरी येथील भाजपा कार्यालयात ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या सेवा संकल्प अभियानाचा एक भाग म्हणून हा उपक्रम घेण्यात आला.

रक्तदान शिबिराला माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते यांनी भेट देत रक्तदात्यांचे कौतुक केले. रक्तदान करणाऱ्या नागरिकांना त्यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. ‘रक्तदान हेच श्रेष्ठ समाजसेवेचे माध्यम’ या भावनेतून नागरिकांनी शिबिरात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
यावेळी सुशील खारकर, प्रशांत वसाके, बंटीभाऊ येल्लावार तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी रक्तदान शिबिरात विशेष सहभाग नोंदवत उपक्रमाला सहकार्य केले. त्यांच्या योगदानामुळे शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
दरम्यान, डॉ. अशोकजी नेते यांनी भाजपा कार्यालयात विराजमान असलेल्या श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेऊन विधिवत पूजन केले. गणरायाच्या चरणी सर्वांच्या सुख-समृद्धीसह समाजाच्या कल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली.
यावेळी भाजयुमो जिल्हाध्यक्ष तनय देशकर, शहराध्यक्ष डॉ. सुयोग बाळबुद्धे, नगरसेवक मनोज भुपाल, जिल्हा उपाध्यक्ष साकेत भानारकर, माजी नगरसेवक तथा ज्येष्ठ नेते मनोज वठ्ठे, माजी शहराध्यक्ष अरविंद नांदुरकर, तालुका महामंत्री स्वप्नील अलगदेवे यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भक्ती, सेवा आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम साधत ब्रह्मपुरी भाजपा कार्यालयातील गणेशोत्सवात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याने या उपक्रमातून समाजसेवेचा प्रेरणादायी संदेश देण्यात आला.

