
‘लोकतंत्र बचाव, अराजकता हटाव’ पदयात्रेसाठी गडचिरोली विधानसभेतून हजारो कार्यकर्ते नागपूरकडे रवाना!

आमदार मिलिंद नरोटे यांच्या नेतृत्वाला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; डॉ. प्रणय खुणे यांच्या हस्ते वाहनांना हिरवी झेंडी
जिल्हा प्रतिनिधी | गडचिरोली, दि. ५ नोव्हेंबर :

लोकशाहीच्या रक्षणाचा निर्धार, संघटनशक्तीचे विराट प्रदर्शन आणि राजकीय संघर्षाचा बुलंद आवाज घेऊन गडचिरोली विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे हजारो कार्यकर्ते नागपूरकडे रवाना झाले. भारतीय जनता पार्टी विदर्भ प्रदेशाच्या वतीने आयोजित ‘लोकतंत्र बचाव, अराजकता हटाव’ या पदयात्रेत सहभागी होण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. खाजगी ट्रॅव्हल्स आणि विविध वाहनांच्या ताफ्याने गडचिरोलीतून नागपूरच्या दिशेने कूच केली.
गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मिलिंदभाऊ नरोटे यांच्या नेतृत्वाखाली या पदयात्रेसाठी हजारो कार्यकर्ते एकवटले. यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रणयभाऊ खुणे यांनी वाहनांच्या ताफ्याला हिरवी झेंडी दाखवून नागपूरकडे रवाना केले. घोषणांचा गजर, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि भाजपाच्या संघटनात्मक ताकदीचे दर्शन घडविणारा हा क्षण उपस्थितांमध्ये विशेष उत्साह निर्माण करणारा ठरला.
लोकशाही मूल्यांचे रक्षण, राजकीय अराजकतेविरोधात आवाज बुलंद करणे आणि पक्षाची भूमिका जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित या पदयात्रेत गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी मार्गस्थ झाले.
यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते भारत खटी, आमदार मिलिंद नरोटे यांचे स्वीय सहाय्यक चेतनभाऊ गोरे, केतन बुरांडे, राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, जिल्हा उपाध्यक्ष नानू उपाध्ये, भाडभीडी पंचायत समिती क्षेत्रप्रमुख विनोद किरमे, रेगडी पंचायत समिती क्षेत्रप्रमुख पलाश घरामी, सुमेन विश्वास, दिनेश मुजुमदार, संदीप भोवरे, सुकंठ राय, देवाजी सातपुते, संदीप गव्हारे, रमेश लेकलवार, राजू सातपुते, विलास सावकार वडेट्टीवार, शुभम दास यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गडचिरोलीच्या भूमीतून नागपूरकडे निघालेला हा हजारोंचा कार्यकर्त्यांचा ताफा म्हणजे भाजपाच्या संघटनशक्तीचे आणि कार्यकर्त्यांच्या एकजुटीचे प्रभावी दर्शन ठरले.

