
अमोल मारकवार | तालुका प्रतिनिधी

अहेरी : अहेरी तालुक्यातील मौजा येरमनार येथील नाल्यावर मंजूर करण्यात आलेल्या बेली ब्रिजचे रखडलेले बांधकाम तातडीने सुरू करून पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस गडचिरोलीचे जिल्हा सचिव तथा येरमनारचे माजी सरपंच बालाजी गावडे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, आलापल्लीचे कार्यकारी अभियंता चंद्रशेखर सालोडकर यांची भेट घेऊन निवेदन साद केले. यावेळी येरमनार बेली ब्रिजच्या रखडलेल्या कामामुळे परिसरातील नागरिकांना होत असलेल्या अडचणींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
शासनाने येरमनार बेली ब्रिजला मंजुरी देऊन सुमारे पाच वर्षांचा कालावधी लोटला आहे. मात्र, या पुलाचे बांधकाम अद्याप अर्धवट अवस्थेत असून संबंधित कंत्राटदाराकडून उर्वरित काम सुरू करण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे, सन २०२५ मध्ये बेली ब्रिजचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेला वाढीव निधीदेखील शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे. निधीची तरतूद होऊनही प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

येरमनार बेली ब्रिजचे काम रखडल्याचा सर्वाधिक फटका येरमनारसह परिसरातील सुमारे १२ ते १५ गावांतील नागरिकांना बसत आहे. विशेषतः पावसाळ्यात नाल्याला पाणी वाढल्याने नागरिकांच्या ये-जा करण्याच्या मार्गात मोठ्या अडचणी निर्माण होतात. विद्यार्थ्यांसह शेतकरी, कामगार, रुग्ण आणि अत्यावश्यक सेवांसाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांकडे यापूर्वीही अनेकदा निवेदने देण्यात आली आहेत. मात्र, अद्यापही प्रत्यक्ष काम सुरू न झाल्याने हा प्रश्न कायम आहे.
त्यामुळे संबंधित कंत्राटदाराला सक्त सूचना देऊन येरमनार बेली ब्रिजचे बांधकाम तातडीने प्रत्यक्ष सुरू करावे आणि काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी बालाजी गावडे यांनी कार्यकारी अभियंता चंद्रशेखर सालोडकर यांच्याकडे केली. यावर कार्यकारी अभियंता सालोडकर यांनी, जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आलेले निवेदन त्यांच्याकडे प्राप्त झाले असून संबंधित कंत्राटदाराशी बेली ब्रिजचे बांधकाम पूर्ण करण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगितले. तसेच लवकरच कंत्राटदाराला काम सुरू करण्याच्या सूचना देण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले.

