
कॉम्रेड सचिन मोतकुरवार यांचे आवाहन; CPI व किसान सभा तहसील कार्यालयावर धडकणार
भामरागड : अनियमित पाऊस, पावसातील दीर्घ खंड, किडींचा प्रादुर्भाव आणि प्रतिकूल हवामानामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI) व ऑल इंडिया किसान सभा (AIKS), गडचिरोली जिल्हा यांच्या वतीने गुरुवार, १२ नोव्हेंबर २०२६ रोजी भामरागड येथे भव्य शेतकरी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण भामरागड तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी, या प्रमुख मागणीसाठी सकाळी ११ वाजता PWD रेस्ट हाऊस येथून मोर्चाला सुरुवात होऊन तहसील कार्यालयावर धडक देण्यात येणार आहे. या मोर्चात शेतकरी, शेतमजूर, महिला, युवक व सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

भामरागड तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात अनियमित पाऊस, पावसातील दीर्घ खंड, किडींचा प्रादुर्भाव आणि प्रतिकूल हवामानाचा मोठा फटका शेतीला बसला आहे. मुरासू चक्रीवादळाच्या परिणामासह विविध नैसर्गिक संकटांमुळे पिकांच्या उत्पादनावर परिणाम झाला असून शेतकऱ्यांसमोर गंभीर आर्थिक संकट उभे राहिले आहे. शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांना दैनंदिन उदरनिर्वाहासोबतच कर्जाची परतफेड, पुढील हंगामासाठी बियाणे व खते खरेदी आणि कुटुंबाचा खर्च भागविण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे शासनाने तातडीने पीक नुकसानीचे पंचनामे करून मदत जाहीर करावी, अशी मागणी CPI व किसान सभेने केली आहे.
CPIचे गडचिरोली जिल्हा सहसचिव कॉम्रेड सचिन मोतकुरवार यांनी शासनाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत शेतकऱ्यांना केवळ आश्वासने नकोत, तर प्रत्यक्ष आर्थिक मदत व योग्य नुकसानभरपाईची गरज असल्याचे म्हटले आहे. संपूर्ण भामरागड तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून सर्व गावांतील पीक नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत, अशी मागणी त्यांनी केली. तसेच पात्र शेतकऱ्यांना पीक विमा व लागू शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा, कृषी कर्जाबाबत नियमानुसार सवलती उपलब्ध करून द्याव्यात आणि पुढील हंगामासाठी बियाणे व खते उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणीही करण्यात आली आहे. जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्यास शेतकरी, शेतमजूर व कष्टकरी जनतेच्या हक्कांसाठी संघर्ष अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता PWD रेस्ट हाऊस, भामरागड येथून सुरू होणारा मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचणार असून तेथे प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे. निवेदनावर तातडीने कार्यवाही करून त्याबाबत लेखी माहिती द्यावी, अशी मागणीही प्रशासनाकडे करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न हा केवळ शेतीपुरता मर्यादित नसून संपूर्ण ग्रामीण समाजाच्या जगण्याशी संबंधित असल्याने या लढ्यात सर्व घटकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन CPI व AIKSच्या वतीने करण्यात आले आहे. “भामरागड तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा, शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्या, जनतेची उपेक्षा बंद करा,” अशा घोषणांनी मोर्चात शासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे.

