
ग्रामीण भागातील युवा खेळाडूंना क्रीडागुण दाखविण्याची संधी; नवयुग क्रीडा मंडळाचा स्तुत्य उपक्रम

नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली,दि.५ नोव्हेंबर : ग्रामीण भागातील युवा खेळाडूंमधील क्रीडागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्यातील संघभावना, खिलाडूवृत्ती आणि नेतृत्वगुणांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने नवयुग क्रीडा मंडळ, हळदा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हळदा प्रीमियर लीग (HPL) क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या स्पर्धेचे उद्घाटन महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी नवयुग क्रीडा मंडळाच्या वतीने महेंद्र ब्राह्मणवाडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. स्पर्धेचे अध्यक्ष प्रमोद चिमुरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला.
उद्घाटनप्रसंगी महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी उपस्थित युवा खेळाडूंशी संवाद साधत त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातही अनेक प्रतिभावान खेळाडू असून, त्यांना योग्य संधी व प्रोत्साहन मिळाल्यास ते क्रीडा क्षेत्रात निश्चितच मोठी भरारी घेऊ शकतात. अशा क्रिकेट स्पर्धांमुळे युवकांमध्ये शिस्त, संघभावना, जिद्द आणि नेतृत्वगुण विकसित होण्यास मदत होते. त्यामुळे युवकांनी खेळाकडे केवळ मनोरंजन म्हणून न पाहता करिअरच्या संधी म्हणूनही पाहावे, असे आवाहन त्यांनी केले.
तसेच हळदा प्रीमियर लीगचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल नवयुग क्रीडा मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे त्यांनी विशेष कौतुक केले. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व संघांना व खेळाडूंना त्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
ग्रामीण क्रीडा संस्कृतीला मिळणार नवी दिशा!
ग्रामीण भागातील युवकांना आपले क्रीडाकौशल्य दाखविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणारा नवयुग क्रीडा मंडळाचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. अशा स्पर्धांमुळे गावागावांतील खेळाडूंना आपली प्रतिभा सिद्ध करण्याची संधी मिळते, तसेच युवकांमध्ये क्रीडाप्रेम, एकजूट आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. हळदा प्रीमियर लीगच्या निमित्ताने परिसरातील क्रिकेटप्रेमींमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून रामकृष्णजी हूलके, नरेश नखाते (माजी सरपंच), दीपक पा. ठाकरे, अमर नवघडे, गजानन लोणारे (धान्य व्यापारी), सचिन बदन, फालगून नखाते, गणेश राऊत, नरेश राऊत, महेश ठाकरे, कोणस ठाकरे, संकेत राऊत, बालू भोयर यांच्यासह अनेक मान्यवर, मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवयुग क्रीडा मंडळाच्या पुढाकारातून सुरू झालेली हळदा प्रीमियर लीग ग्रामीण भागातील क्रिकेटपटूंसाठी नवी ओळख निर्माण करणारी ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

