
मुलचेरा तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी; माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडे निवेदन, थकीत देयके तातडीने मिळवून देण्याची मागणी

जिल्हा प्रतिनिधी|गडचिरोली
मुलचेरा,दि.५ नोव्हेंबर : शासनाच्या विकसित भारत-जी राम जी (VB-G RAM G) योजनेअंतर्गत वैयक्तिक सिंचन विहिरींचे बांधकाम पूर्ण करून वर्ष उलटले, तरीही शेतकऱ्यांना अद्याप कुशल कारागिरांच्या कामाचे देयक मिळालेले नाही. स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून, प्रसंगी कर्ज काढून विहिरींचे बांधकाम करणाऱ्या शेतकऱ्यांची शासनाच्या निधीअभावी आर्थिक कोंडी झाली आहे. थकीत बिलांसाठी शेतकऱ्यांना वारंवार शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

या गंभीर प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मुलचेरा तालुक्यातील त्रस्त शेतकऱ्यांनी ५ नोव्हेंबर २०२६ रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अर्जुनी-मोरगाव विधानसभा प्रभारी डॉ. अजयभाऊ कंकडालवार यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
विकसित भारत-जी राम जी (पूर्वीची मनरेगा) योजनेअंतर्गत सन २०२४-२५ मध्ये तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी वैयक्तिक सिंचन विहिरींचे बांधकाम पूर्ण केले.
शासनाच्या नियमानुसार विहिरीचे काम पूर्ण झाल्यानंतर कुशल कारागिरांच्या कामाचे देयक मिळणे अपेक्षित होते. मात्र, बांधकाम पूर्ण होऊन तब्बल एक वर्षाचा कालावधी लोटला असतानाही शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप एक रुपयाही जमा झालेला नाही.
यासंदर्भात शेतकऱ्यांनी पंचायत समिती, मुलचेरा येथे संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, शासनाकडून अद्याप निधी उपलब्ध झालेला नसल्याचे उत्तर देण्यात येत आहे. मात्र, शासनाच्या योजनेवर विश्वास ठेवून स्वतःचे पैसे गुंतविणाऱ्या शेतकऱ्यांनी आता आर्थिक संकटाचा सामना कसा करायचा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आधीच शेतीसाठी लागणारा वाढता खर्च, कर्जाचा बोजा आणि नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी अडचणीत असताना विहिरींचे कुशल बिल वर्षभरापासून थकीत राहणे म्हणजे शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडण्यासारखे आहे. कर्ज काढून विहिरींचे बांधकाम करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याजाचा अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागत असून, शेतीच्या पुढील हंगामासाठी आर्थिक नियोजन करणेही कठीण झाले आहे.
थकीत देयके मिळवून देण्यासाठी अजय कंकडालवार यांचा पुढाकार!
शेतकऱ्यांनी निवेदनातून आपल्या व्यथा मांडत संबंधित विभागाकडून प्रकरणाची चौकशी करून थकीत कुशल बिलाची रक्कम तातडीने मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याची मागणी केली. यावेळी अजयभाऊ कंकडालवार यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे लवकरच पाठपुरावा करून थकीत देयके मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
शेतकऱ्यांचा सवाल : काम पूर्ण, मग देयकासाठी वर्षभर प्रतीक्षा का?
शासनाच्या योजनेतून सिंचनाची सुविधा निर्माण व्हावी, शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याची उपलब्धता व्हावी, या उद्देशाने विहिरींची कामे पूर्ण करण्यात आली. मात्र, काम पूर्ण झाल्यानंतरही देयके मिळत नसतील, तर शेतकऱ्यांनी आर्थिक भार किती दिवस सहन करायचा? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
शासनाने तातडीने निधी उपलब्ध करून मुलचेरा तालुक्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांची थकीत कुशल बिलाची देयके अदा करावीत, अन्यथा शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही यावेळी शेतकऱ्यांनी दिला.
आता प्रशासन या गंभीर प्रश्नाची किती लवकर दखल घेते आणि शेतकऱ्यांच्या खात्यात थकीत रक्कम कधी जमा होते, याकडे संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

