
चामोर्शी तालुक्यातील राममोहनपूर परिसरात कारवाई; ४ लाख ५६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत, चौघांविरुद्ध गुन्हा
जिल्हा प्रतिनिधी|गडचिरोली
चामोर्शी(आष्टी ): मुखबिराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे आष्टी पोलिसांनी मौजा कान्हाळगाव जंगल परिसरातील नाल्याजवळ धाड टाकून गावठी दारू निर्मितीचा पर्दाफाश केला. दोन पंचांच्या उपस्थितीत करण्यात आलेल्या या कारवाईत काही इसम लाकडाची चूल पेटवून हातभट्टी पद्धतीने गुडामोहाचा सडवा तयार करून दारू गाळताना आढळून आले.

पोलिस व पंचांची चाहूल लागताच संबंधित इसमांनी जंगलातील दाट झाडीचा फायदा घेत घटनास्थळावरून पलायन केले.
त्यानंतर पोलिसांनी पंचांसमक्ष घटनास्थळाची पाहणी केली असता, जमिनीत खड्डा करून लपवून ठेवलेला २२ बॅरल गुडामोहाचा सडवा, तसेच हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य आढळून आले. पोलिसांनी हा संपूर्ण मुद्देमाल जप्त केला असून त्याची एकूण किंमत ४ लाख ५६ हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
घटनास्थळावरून पळून गेलेल्या इसमांची ओळख पंच तसेच परिसरातील शेळ्या व गुरे चारणाऱ्या व्यक्तींच्या माध्यमातून पटविण्यात आल्याचे पोलिसांच्या हकीकतीत नमूद आहे. त्यानुसार दीपेश दीपक बारई (३२), अजय विश्वनाथ दास (३६), बिश्वजीत नारायण सरकार (३७) आणि रणजित सुनील सरकार (४३), सर्व रा. राममोहनपूर, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणी अपराध क्रमांक २८०/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातील कलम ६५(क), ६५(ई), ६५(फ) व ८३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाईत फिर्यादी अरुणकुमार उद्धव टेकाम (वय ४७), पोलीस हवालदार क्र. १९७२, पोलीस स्टेशन आष्टी यांनी तक्रार दिली आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा/३०५४ शंकर सिडाम करीत आहेत.
जंगलाच्या आड सुरू असलेल्या हातभट्टी दारू निर्मितीवर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

