
श्री संताजी नागरी सहकारी पतसंस्थेची दुसरी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली, दि. २० सप्टेंबर:

सहकार क्षेत्राच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सहकारी पतसंस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. संस्थेच्या प्रगतीसाठी सभासदांनी सक्रिय सहभाग घेण्यासोबतच आर्थिक शिस्त, पारदर्शक कारभार आणि परस्पर विश्वासाला प्राधान्य द्यावे. तसेच सहकाराच्या माध्यमातून उद्योग सहकारी संस्था उभारून नव्या उद्योजकांची निर्मिती करण्यावर भर द्यावा, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या., पुणेचे संचालक तथा गडचिरोली नगरपरिषदेचे माजी सभापती इंजि. प्रमोदजी पिपरे यांनी केले.
श्री संताजी नागरी सहकारी पतसंस्था मर्या., गडचिरोली यांची सन २०२५-२६ ची दुसरी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दि. २० सप्टेंबर रोजी श्री संताजी स्मृती प्रतिष्ठान, आरमोरी रोड, गडचिरोली येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. यावेळी उद्घाटक म्हणून इंजि. प्रमोदजी पिपरे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित सभासदांना मार्गदर्शन करताना इंजि. पिपरे यांनी सहकार क्षेत्राची सामाजिक व आर्थिक भूमिका स्पष्ट केली.
पतसंस्थेने सभासदांचा विश्वास कायम राखत पारदर्शक व शिस्तबद्ध कारभारातून प्रगती साधावी, असे आवाहन त्यांनी केले.
सभासदांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासोबतच त्यांना स्वावलंबी व सक्षम करण्यासाठी सहकारी संस्थांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. सहकार क्षेत्रातून विविध उद्योग व सहकारी संस्था निर्माण झाल्यास स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन उद्योजकतेला चालना मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडचिरोलीच्या नगराध्यक्ष सौ. प्रणोतीताई निंबोरकर होत्या. प्रमुख अतिथी म्हणून श्री संताजी प्रतिष्ठान गडचिरोलीचे सचिव सुरेश भांडेकर, श्री नागरी सहकारी पतसंस्था मर्या., गडचिरोलीचे अध्यक्ष भय्याजी सोमणकर, उपाध्यक्ष राजेंद्र भुरसे, संचालक विजय भांडेकर, संचालक गजानन बारसागडे, प्रवर्तक रघुनाथ भांडेकर, रमेश बोधलकर, संचालक मंडळाचे पदाधिकारी, सभासद व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी श्री संताजी नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या वतीने इंजि. प्रमोदजी पिपरे यांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच पतसंस्थेला आर्थिक देणगी देणाऱ्या देणगीदारांचा आणि संस्थेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्रतिनिधींचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व श्री संताजींचे स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
सभेमध्ये संस्थेच्या कार्याचा आढावा घेत आगामी काळातील विकासाच्या दिशेने वाटचाल करण्याबाबत चर्चा करण्यात आली. सभासदांच्या सहभागातून संस्थेला अधिक सक्षम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालिका शिलाताई सोमणकर यांनी केले, तर आभार उपाध्यक्ष राजेंद्र भुरसे यांनी मानले

