
गोविंदपूर-मथुरानगर अंतिम सामन्याने रंगला फुटबॉलचा जल्लोष; खेळाडूंना डॉ. अशोक नेते यांनी दिल्या शुभेच्छा
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
गडचिरोली/चामोर्शी : तालुक्यातील वसंतपूर येथे ‘श्री गणेश युवा फुटबॉल क्लब’च्या वतीने आयोजित भव्य फुटबॉल स्पर्धा-२०२६ चा बक्षीस वितरण व समारोप सोहळा माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या स्पर्धेमुळे वसंतपूरच्या मैदानावर अक्षरशः फुटबॉलचा थरार अनुभवायला मिळाला.

स्पर्धेचा अंतिम सामना गोविंदपूर विरुद्ध मथुरानगर या दोन बलाढ्य संघांमध्ये रंगला. सामना पाहण्यासाठी परिसरातील क्रीडाप्रेमींची मोठी गर्दी झाली होती. डॉ. अशोकजी नेते यांनी मैदानात उपस्थित राहून अंतिम सामन्याचा आनंद घेतला. त्यांनी खेळाडूंशी हस्तांदोलन करून त्यांचे मनोबल वाढविले तसेच फुटबॉलला किक मारून सामन्याला औपचारिक सुरुवात केली. त्यांच्या उपस्थितीने खेळाडूंच्या उत्साहाला आणखी उधाण आले.
‘फुटबॉल खेळ मला आकर्षित करू लागलाय’-डॉ. अशोकजी नेते
समारोपप्रसंगी बोलताना डॉ. अशोकजी नेते म्हणाले, “मुळात क्रिकेट हा माझा अतिशय आवडता खेळ आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील अनेक बंगालीबहुल गावांमध्ये फुटबॉल स्पर्धांची उद्घाटने आणि सामने पाहण्याचा प्रसंग आला. या खेळातील प्रचंड ऊर्जा आणि तरुणांचा उत्साह पाहून आता मलाही फुटबॉल खेळाची विशेष आवड निर्माण झाली आहे.”
फुटबॉलसारख्या क्रीडा स्पर्धांमुळे ग्रामीण भागातील युवकांना आपले कौशल्य दाखविण्यासाठी व्यासपीठ मिळते. अशा स्पर्धांमधून खेळाडूंमध्ये शिस्त, संघभावना, नेतृत्वगुण आणि जिद्द निर्माण होते, असे सांगत त्यांनी अंतिम फेरीत पोहोचलेल्या तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा मानवाधिकार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष डॉ. प्रणय खुणे, भाजप घोट-आष्टी मंडळाचे अध्यक्ष राकेश सरकार, गौर मंडल, परिमल रॉय, हरेन सरकार, बबलू सरकार, रमेश अधिकारी यांच्यासह भाजपचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व क्रीडाप्रेमी उपस्थित होते.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक मंडळाचे अध्यक्ष कुमारेश मंडल, दिनेश मंडल, अवनी रॉय, ज्योतिष रॉय, विवेक बिस्वास, सुपाल मंडल तसेच त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

