
“मूल नगरीत भक्तिमय वातावरणात पहिलं आगमन झालं मुलच्या राजाचं “

रिमझिम पावसात ‘मूलच्या राजा’चे दिमाखात आगमन!
९६ वर्षांची परंपरा जपत गणरायाच्या स्वागतासाठी मूल नगरी दुमदुमली; महिला, बालगोपालांसह भाविकांमध्ये उत्साह

मूल | न्यूज जागर चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी.
मूल नगरीतील मानाचा आणि भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या सार्वजनिक नेताजी गणेश मंडळ, तेली मोहल्ला मूल,येथील ‘मूलच्या राजा’चे यंदा दिमाखात आगमन झाले. तब्बल ९६ वर्षांची परंपरा लाभलेल्या या गणरायाच्या आगमनाची भाविकांना वर्षभरापासून प्रतीक्षा असते. अखेर गणरायाच्या आगमनाचा दिवस उजाडताच संपूर्ण मूल नगरीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
गणरायाच्या आगमनासाठी रिमझिम पावसानेही हजेरी लावत जणू राजाचे स्वागतच केले. पावसाची पर्वा न करता महिला, बालगोपाल, भाविक तसेच मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आगमन सोहळ्यात सहभागी झाले. गणरायाच्या गीतांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला.
दुर्गा माता मंदिर, बजाज शोरूम परिसरापासून आगमन सोहळ्याला सुरुवात झाली. त्यानंतर बसस्थानक, गांधी चौक, पोस्ट ऑफिस मार्गे ‘मूलच्या राजा’ची भव्य मिरवणूक तेली मोहल्ल्यातील सार्वजनिक नेताजी गणेश मंडळाच्या मंडपापर्यंत काढण्यात आली.
गणरायाचे संगीत , गणरायाच्या जयघोषाने दुमदुमलेले रस्ते, रिमझिम पाऊस आणि गणेशभक्तांचा उत्साह यामुळे संपूर्ण मूल नगरीला भक्तीमय स्वरूप प्राप्त झाले होते. विशेषतः महिला आणि लहानग्यांमध्ये गणरायाच्या आगमनाची मोठी उत्सुकता पाहायला मिळाली.
‘मूलच्या राजा’च्या आगमनासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांना वर्षभर वाट पाहावी लागते. त्यामुळे आगमन सोहळ्याच्या दिवशी कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. गणरायाचे दर्शन घेण्यासाठी मार्गावर भाविकांची गर्दी झाली होती.
९६ वर्षांची अखंड परंपरा, भक्तीचा उत्साह आणि रिमझिम पावसाची साथ अशा वातावरणात ‘मूलच्या राजा’चे आगमन मोठ्या जल्लोषात पार पडले.
📝 Chetan Kamde News Jagar📝

