
शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा; २९ ऑक्टोबरपासून येनापुर येथे ठिय्या आंदोलन

टप्पा क्रमांक २ व ५ मधील भूसंपादनाला तीव्र विरोध; शेतकरी-ग्रामस्थांचा लोकशाही मार्गाने लढा
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली (चामोर्शी), दि. २८ ऑक्टोबर :

गडचिरोली जिल्ह्यात प्रस्तावित औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) प्रकल्पासाठी होणाऱ्या भूसंपादनाविरोधात चामोर्शी तालुक्यातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. टप्पा क्रमांक २ मधील ४९२ हेक्टर आणि टप्पा क्रमांक ५ मधील १,६०४ हेक्टर, अशा एकूण २,०९६ हेक्टर क्षेत्रावरील प्रस्तावित MIDC प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी गुरुवार, दि. २९ ऑक्टोबर २०२६ पासून ठिय्या आंदोलन छेडण्यात येणार आहे. येणापूर व जयरामपूर परिसरातील बाधित शेतकरी, जमीनधारक आणि ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती निवेदनातून देण्यात आली आहे.
संमती नसताना भूसंपादनाचा आरोप!
मौजा मुधोली चक क्रमांक १ येथील शेतकऱ्यांनी भूसंपादनासाठी संमती दिलेली नसतानाही संबंधित जमिनींच्या प्रक्रियेत पुढील कार्यवाही केली जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, संमतीपूर्वक करारनामा झाल्याचे गृहीत धरून नोटीस देण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. ही बाब अन्यायकारक असल्याचे सांगत शेतकऱ्यांनी संबंधित राजपत्रीय अधिसूचना रद्द करण्याची मागणी केली आहे.
दिनांक २९ सप्टेंबर २०२६ रोजीच्या पत्राचा संदर्भ देत आंदोलनकर्त्यांनी भूसंपादन प्रक्रियेवर आक्षेप नोंदविला आहे. शेतकऱ्यांच्या संमतीचा प्रश्न निकाली निघाल्याशिवाय प्रकल्पासाठी जमिनी संपादित करू नयेत, अशी त्यांची ठाम भूमिका आहे.
२,०९६ हेक्टर जमीन प्रकल्पातून वगळण्याची मागणी
प्रस्तावित MIDC प्रकल्पामुळे स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये चिंता निर्माण झाली असून, शेती व जमिनीशी संबंधित प्रश्न ऐरणीवर आले आहेत. त्यामुळे टप्पा क्रमांक २ आणि टप्पा क्रमांक ५ मधील संपूर्ण २,०९६ हेक्टर क्षेत्राचा प्रस्ताव रद्द करावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय, शेतकरी आणि ग्रामस्थांच्या प्रतिनिधींसोबत बैठक आयोजित करून त्यांच्या मागण्यांवर लेखी स्वरूपात निर्णय द्यावा, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
प्रशासनासमोर शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन!
आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बाधित शेतकरी व ग्रामस्थ गुरुवार, दि. २९ ऑक्टोबर रोजी संबंधित मंडळ अधिकारी येणापूर यांच्या कार्यालयासमोर शांततामय आणि लोकशाही मार्गाने ठिय्या आंदोलन करणार आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली, उपविभागीय अधिकारी चामोर्शी,तहसील कार्यालय, चामोर्शी, चामोर्शी पोलीस स्टेशन आणि आष्टी पोलीस स्टेशन यांना निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या आहेत.
शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष लागले!
प्रस्तावित MIDC प्रकल्पासंदर्भातील भूसंपादन प्रक्रियेमुळे निर्माण झालेल्या प्रश्नांवर वरिष्ठ अधिकारी आणि महाराष्ट्र शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. शेतकरी व ग्रामस्थांना न्याय मिळण्यासाठी संबंधित विभागांनी योग्य ती कार्यवाही करावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
आता २९ ऑक्टोबरच्या ठिय्या आंदोलनाकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले असून, शेतकऱ्यांच्या मागण्यांवर प्रशासन काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे .
.—————
जयरामपूर परिसरातील शेतकऱ्यांनी 29 ऑक्टोबरला जमीन अधिग्रहण विरोधात येणापूर येथे आंदोलन करण्यासाठी आज दिनांक 28 ऑक्टोबरला उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यासाठी आले असता निवेदन देण्यास अधिकाऱ्यांनी नाकारल्याने शेतकरी व महिलांनी तब्बल तीन तास उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडला.

