
एटापल्ली : ग्रामपंचायत चोखेवाडा अंतर्गत चोखेवाडा टोला येथील झोपडीत सुरू असलेल्या मिनी अंगणवाडीचे अखेर जिल्हा परिषद शाळेच्या अतिरिक्त खोलीत स्थलांतर करण्यात आले आहे. त्यामुळे अंगणवाडीतील सुमारे १० बालकांना दिलासा मिळाला असून, भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI) च्या निवेदनावर प्रशासनाकडून मागणी पूर्ण करण्यात आली आहे.

चोखेवाडा टोला येथील मिनी अंगणवाडीसाठी स्वतंत्र इमारत उपलब्ध नसल्यामुळे अंगणवाडी झोपडीत चालविली जात होती. यामुळे बालकांना पोषण, आरोग्य आणि पूर्वप्राथमिक शिक्षणाच्या सेवा देताना अडचणी निर्माण होत होत्या. ही बाब लक्षात घेऊन भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI), गडचिरोली जिल्हा समितीच्या वतीने बाल विकास प्रकल्प अधिकारी, एटापल्ली यांच्याकडे निवेदन देऊन अंगणवाडीसाठी सुरक्षित जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती.
या निवेदनाची दखल घेत बाल विकास अधिकारी विद्याधर बुरीवार यांनी चोखेवाडा टोला येथे प्रत्यक्ष गावभेट देऊन अंगणवाडीच्या परिस्थितीची पाहणी केली आणि मिनी अंगणवाडीचे जिल्हा परिषद शाळेच्या अतिरिक्त खोलीत स्थलांतर केले. तसेच निवेदनावर करण्यात आलेल्या कारवाईची माहिती त्यांनी CPI चे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार यांना दिली.

या कार्यवाहीमुळे बालकांना झोपडीतून बाहेर पडून पक्क्या इमारतीतील खोलीत बसण्याची सुविधा मिळाली आहे. त्यामुळे पालकांमध्येही समाधान व्यक्त होत आहे.
कॉ. सचिन मोतकुरवार यांचे वक्तव्य : “चोखेवाडा टोला येथील मिनी अंगणवाडी झोपडीत सुरू असल्यामुळे लहान बालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. या प्रश्नावर CPI च्या वतीने निवेदन देऊन पाठपुरावा करण्यात आला. अखेर बाल विकास अधिकारी विद्याधर बुरीवार यांनी गावभेट देऊन अंगणवाडीचे जिल्हा परिषद शाळेच्या अतिरिक्त खोलीत स्थलांतर केले. त्यामुळे बालकांना पक्क्या इमारतीत बसण्याची सुविधा मिळाली, याचे आम्हाला समाधान आहे. आमच्या मागणीची दखल घेऊन तातडीने कार्यवाही केल्याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांचे आभार.”
या पाठपुराव्यात CPI चे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार आणि जिल्हा सदस्य कॉ. सुरज जककुलवार व गावकरी सोबत होते.

