
नागरिक, युवक व अनुयायांचा उत्स्फूर्त सहभाग
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
गडचिरोली/चामोर्शी : मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा या भावनेतून संत निरंकारी मिशन व संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन (दिल्ली), ब्राँच चामोर्शी यांच्या वतीने रविवार, दि. १३ सप्टेंबर २०२६ रोजी संत निरंकारी सत्संग भवन, चामोर्शी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाचे उद्घाटन भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत निरंकारी मिशनचे झोनल इन्चार्ज, वडसा किसन नागदेवे होते. प्रमुख अतिथी म्हणून गजानन तनकुलवार, खुशाल झोडगे, ओमप्रकाश साखरे, डॉ. अंजली साखरे, कन्नाके महाराज, जीवनकला बोरकुटे, अशोक बोरकुटे, गिरीधर कन्नाके, मिटपल्लीवर महाराज, घनश्याम बोदलकर, सुरेश बावणे, नंदू रायसिडाम, सुभाष ढाली यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी रक्तदानाला अत्यंत श्रेष्ठ सामाजिक कार्य असल्याचे सांगितले.
अपघातग्रस्त, गंभीर आजारांनी त्रस्त तसेच विविध उपचारांदरम्यान रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यासाठी अशा रक्तदान शिबिरांची नितांत गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
“रक्तदान हे केवळ दान नसून एखाद्या गरजू व्यक्तीला जीवनदान देण्याचे महान कार्य आहे,” असे सांगत डॉ. होळी यांनी संत निरंकारी मिशन व संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या सामाजिक बांधिलकीचे विशेष कौतुक केले.
या रक्तदान शिबिराला चामोर्शी शहर व परिसरातील नागरिक, युवक तसेच संत निरंकारी मिशनच्या अनुयायांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सामाजिक जाणीव, मानवतेची भावना आणि सेवाभाव यांचा सुंदर संगम या उपक्रमातून पाहायला मिळाला.
संत निरंकारी मिशनच्या वतीने आयोजित या उपक्रमामुळे ‘रक्तदान करा, जीवन वाचवा’ हा मानवतावादी संदेश समाजात पोहोचला असून, सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

