
प्रतिनिधी चामोर्शी/भेंडाळा,दि.३ सप्टेंबर : भेंडाळा गावातील मुलांना मारून टाकण्याची धमकी देणारे धक्कादायक हस्तलिखित पत्र आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या पत्रामध्ये गावातील मुलांना लक्ष्य करून गंभीर स्वरूपाच्या धमक्या देण्यात आल्याचे दिसून येत आहे. रक्ताचे डाग नसुन नेलपेंट असलेल्या या पत्रांमुळे घटनेचे गांभीर्य आणखी वाढले आहे.
गावात आढळलेल्या या पत्रांमध्ये “तुमच्या मुलांना मारून टाकू” अशा आशयाच्या धमक्या देण्यात आल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसते. पत्रामध्ये काही ठिकाणी गावातील मुलांचा तसेच पालकांचा उल्लेख असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पत्रे ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. धमकीचे पत्र कोणी लिहिले, त्यामागील नेमका उद्देश काय आहे, ही धमकी प्रत्यक्ष धोक्याची आहे की कोणीतरी भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, या प्रकारामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी शांतता राखावी आणि कोणतीही संशयास्पद माहिती आढळल्यास तातडीने पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
धमकीचे पत्र खरे की खोडसाळपणा? याचा उलगडा पोलिसांच्या तपासानंतरच होणार असून, संपूर्ण भेंडाळा परिसराचे लक्ष आता पोलिसांच्या कारवाईकडे लागले आहे.

