
पंचशिल वाळके द्वारा
जिल्हा परिषदेत २०२६-२७ साठी कंत्राटी शिक्षक भरतीला परवानगी
DMF निधीतून तात्पुरत्या शिक्षकांची नियुक्ती; निवड प्रक्रियेसाठी पारदर्शक निकष निश्चित
चंद्रपूर : जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत माध्यमिक तसेच प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांची रिक्त पदे लक्षात घेता सन २०२६-२७ या शैक्षणिक सत्रासाठी जिल्हा खनिज प्रतिष्ठान (DMF) योजनेंतर्गत कंत्राटी शिक्षकांची तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयाकडून दिनांक २५ ऑगस्ट २०२६ रोजी संबंधित यंत्रणांना निर्देश देण्यात आले आहेत.
उपलब्ध पत्रानुसार, शिक्षकांची नियुक्ती मानधन तत्त्वावर करण्यात येणार असून प्राथमिक, विषय शिक्षक आणि माध्यमिक शिक्षक अशा पदांसाठी शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. कंत्राटी शिक्षकांना घड्याळी तासिका तत्त्वावर अथवा प्रतिमाह कमाल ₹१२,००० मानधन, शासनाच्या प्रचलित नियमांनुसार देण्यात येणार असल्याचे नमूद आहे.

मुलाखत नाही; गुणांकनावर निवड
या भरती प्रक्रियेत मुलाखत घेतली जाणार नसून, उमेदवारांची निवड शैक्षणिक पात्रता व निश्चित केलेल्या गुणांकन पद्धतीनुसार करण्यात येणार आहे.
गुणांकनाचे निकष :
प्राथमिक शिक्षक : इयत्ता १२ वी – ४०%, बी.एड. – ६०%
विषय शिक्षक : १२ वी – २०%, बी.एड. – ४०%, पदवी – ४०%
माध्यमिक शिक्षक : १२ वी – २०%, बी.एड. – ४०%, पदवी – ४०%
समान गुण मिळाल्यास प्रथम TET/CTET उत्तीर्ण उमेदवार, त्यानंतर मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी तसेच स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यानंतरही समानता राहिल्यास लॉटरी पद्धतीने निवड करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
संपूर्ण प्रक्रिया १५ दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश
जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून नियुक्ती आदेशापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया जास्तीत जास्त १५ दिवसांत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अर्ज स्वीकारणे, कागदपत्रांची छाननी, गुणांकन यादी, निवड यादी, हरकतींसाठी कालावधी आणि अंतिम निवड यादी अशा टप्प्यांमध्ये प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
निवड यादी प्रसिद्ध झाल्यानंतर हरकतींसाठी कालावधी देण्यात येणार असून त्यानंतर अंतिम निवड व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
शाळा व्यवस्थापन समितीची महत्त्वाची भूमिका
कंत्राटी शिक्षकांच्या नियुक्तीची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक, गुणवत्ताधारित व नियमानुसार राबविण्याची जबाबदारी संबंधित मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीवर राहणार असल्याचे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच नियुक्त शिक्षकांची उपस्थिती, कामकाज व अध्यापनाची गुणवत्ता यावर संबंधित मुख्याध्यापकांनी नियमित देखरेख ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
२० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे लक्ष्य
जिल्हा परिषद प्रशासनाने संबंधित शाळांना आवश्यक कार्यवाही करून दिनांक २० सप्टेंबर २०२६ पर्यंत नियुक्ती प्रक्रिया पूर्ण करण्याचे लक्ष्य दिले आहे. त्यामुळे रिक्त शिक्षक पदांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, निवड प्रक्रियेत मुलाखतीऐवजी गुणांकन, प्राधान्यक्रम आणि लॉटरीची तरतूद करण्यात आल्याने ही प्रक्रिया कितपत पारदर्शकपणे राबविली जाते, याकडे उमेदवार तसेच पालकांचे लक्ष लागले आहे.

