
झाशी राणी नगर येथे इंडियन ओव्हरसीज बँकेच्या शाखेचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते थाटात उद्घाटन
जिल्हा प्रतिनिधी |गडचिरोली : गडचिरोली शहरातील झाशी राणी नगर येथे इंडियन ओव्हरसीज बँकेच्या (IOB) गडचिरोली जिल्ह्यातील पहिल्याच शाखेचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते नव्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. जिल्ह्यातील नागरिकांसाठी आधुनिक आणि विश्वासार्ह बँकिंग सेवेच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

राष्ट्रीयीकृत बँक असलेल्या इंडियन ओव्हरसीज बँकेची शाखा प्रथमच गडचिरोली जिल्ह्यात सुरू झाल्याने सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, उद्योजक, शेतकरी तसेच विविध व्यावसायिक घटकांना आधुनिक, सुरक्षित आणि सुलभ बँकिंग सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील आर्थिक व्यवहारांना वेग मिळण्यासोबतच व्यापार, उद्योग आणि विविध आर्थिक उपक्रमांना मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
उद्घाटनप्रसंगी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी गडचिरोलीत इंडियन ओव्हरसीज बँकेची पहिली शाखा सुरू झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. नव्या शाखेच्या माध्यमातून नागरिकांना दर्जेदार बँकिंग सुविधा मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “जिल्ह्याच्या आर्थिक प्रगतीमध्ये सक्षम बँकिंग व्यवस्था महत्त्वाची भूमिका बजावते. IOBच्या या शाखेमुळे नागरिकांच्या आर्थिक गरजा अधिक प्रभावीपणे पूर्ण होण्यास मदत होईल,” असे त्यांनी सांगितले.
उद्घाटन सोहळ्यास भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉ. भारत खटी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, भाजपा शहर महामंत्री तथा नगर परिषद उपाध्यक्ष निखिल चरडे, पाणीपुरवठा सभापती लिलाधर भरडकर, कृषी अधिकारी प्रीती हिरडकर, IOB वरिष्ठ क्षेत्रीय प्रबंधक प्रदीपकुमार शहा, IOB मुख्य प्रबंधक सवाईसिंगजी मीना, डॉ. किशोर वैद्य, डॉ. प्रीतीताई वैद्य यांच्यासह बँकेचे अधिकारी, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गडचिरोलीच्या आर्थिक वाटचालीला नवे बळ!
गडचिरोली जिल्ह्यात IOBची पहिली शाखा सुरू झाल्याने बँकिंग सुविधांच्या विस्तारासोबतच जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिकांना विविध आर्थिक सेवा अधिक सहज उपलब्ध होणार असल्याने या शाखेचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

