
आलापल्ली परिसरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी केली प्रार्थना

अमोल मारकवार|तालुका प्रतिनिधी
अहेरी: देशासह राज्यभरात सध्या नवरात्रोत्सवानिमित्त भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात देवीच्या विविध रूपांची पूजा-अर्चा करून भक्तांकडून सुख, समृद्धी आणि कल्याणासाठी प्रार्थना केली जात आहे.

नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी आलापल्ली येथील विविध शारदा व बतकम्मा मंडळांना भेट दिली. यावेळी त्यांनी देवीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. तसेच सर्व नागरिकांच्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद आणि भरभराट नांदो, अशी प्रार्थना केली.
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने विविध मंडळांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. या उत्सवातून धार्मिक श्रद्धा, सांस्कृतिक परंपरा आणि सामाजिक एकोपा जपण्याचा संदेश दिला जात आहे.
यावेळी युवानेते कुमार अवधेशराव बाबा आत्राम, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मंडळांचे सदस्य उपस्थित होते. राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या भेटीदरम्यान देवीचे दर्शन घेत भक्तांनी उत्सवाचा आनंद साजरा केला.

